उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर..

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. मंगळवारी दिनांक १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी गुलाबराव पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. मंगळवारी पाचोरा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही खास उपस्थित होते. पाचोरा येथील त्यांचे कार्यक्रम आटोपल्यानंतर पाचोर्‍याहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाळधी येथे पोहोचले आणि गुलाबराव पाटलांच्या निवासस्थानी जाऊन दोघांनीही त्यांचे सांत्वन केले.

गुलाबराव पाटलांच्या मातोश्रींच्या निधनाचा मंगळवारी ७ वा दिवस होता. आणखी तीन दिवस म्हणजे दहाव्याच्या कार्यक्रम होईपर्यंत गुलाबराव पाटलांनी कुठल्याही जाहीर कार्यक्रमाला न जाता सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पाळधी येथील निवासस्थानी गुलाबरावांच्या सांत्वनासाठी तसेच द्वार दर्शनासाठी जिल्हाभरातून अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नातेवाईक आणि मित्रमंडळींची जणू रीघ लागलेली दिसली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाचोर्‍याला आले असता वेळात वेळ काढून ते पाळधी येथे जाऊन गुलाब रावांचे सांत्वन केले. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री गुलाबराव पाटील असल्यामुळे त्यांच्या सांत्वनासाठी त्यांचे निवासस्थानी जाणे हे त्यांचे कर्तव्य म्हणता येईल.

तथापि दुःखामध्ये सर्वपक्षीय मतभेद विसरून त्यांच्या दुःखात सामील होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. परंतु गेले ३५ वर्षे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात एकनिष्ठेने गुलाबराव पाटील राहिले आहेत. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रात शिवसेना वाढीसाठी विशेष असे प्रयत्न केले आहेत. मात्र सव्वा वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व शिवसेनेने फूट पाडले आणि शिवसेनेचे ४० आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. भाजपशी हात मिळवणी करून शिंदे फडणवीस यांनी सरकार स्थापन केले आणि त्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची बक्षिसे मिळाली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुलाबराव पाटलांसह जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आमदार आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात सामील झाले.

शिवसेनेतील फुटीच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. तथापि ३५ वर्षे आपल्या पक्षात असलेले एका शिवसैनिकाच्या मातोश्रीच्या निधनाने गुलाबराव पाटलांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडे हलके करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी जळगाव आले असताना गुलाबरावांच्या निवासस्थानी जाऊन दोन शब्द सांत्वन पर बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या मनाचा मोठेपणा दिसला असता…

रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव मध्ये चार ते पाच तास होते. दोन पुतळ्यांचे अनावरण आणि जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर पाळधीत गुलाबराव पाटलांचे निवासस्थान होते. सर्व राजकीय अभिनेवेश बाजूला ठेवून मातेचे छत्र हरपल्याचे दुःख काय असते, हे उद्धव साहेबांना सांगण्याची आवश्यकता नव्हती. म्हणून त्यांनी वाकडी वार करून गुलाबराव पाटलांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी गेले असते तर उद्धव ठाकरेंची प्रतिमा आणखी उंचावली असती. राजकारणात आजचा शत्रू हा कायमचा शत्रू नसतो आणि आजचा मित्र हा कायमचा मित्र राहील याची शाश्वती नसते. उद्धव साहेबांना हे सांगण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. तथापि ते एवढ्या जवळ येऊन गुलाबरावांच्या निवासस्थानी गेले असते तर फार चांगले झाले असते, असे अनेकांचे म्हणणे आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र उद्धव ठाकरे मुंबईला रवाना झाल्यानंतर गुलाबराव पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कदाचित अंबादास दानवेंवर ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सोपविली असावी. तसेच वेळेच्या अभावी आणि सुरक्षेच्या कारणास्तव उद्धव ठाकरेंनी पाळधी जाणे टाळले असावे, परंतु त्यांनी गुलाबरावांच्या प्रति आपल्या संवेदना जाहीर करायला हव्या होत्या, असे अनेकांना वाटते.

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील राजकारणात विळा भोपळ्याचे नाते असताना स्वतः एकनाथ खडसे यांनी सोमवारी गुलाबराव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. नुकतेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन रोहिणी खडसे यांनीही गुलाबराव पाटलांची भेट घेतली, हे विशेष. एकंदरीत हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी सार्वजनिक जीवनात व्यक्तिगत जीवनाला विसरणे आवश्यक असते. गुलाबराव पाटलांच्या मातोश्रींच्या निधनामुळे त्यांच्यावरील मातेचे छत्र हरपल्याने जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखात दै. लोकशाही सहभागी आहे. मातोश्री रेवाबाईंना विनम्र श्रद्धांजली…!

Leave A Reply

Your email address will not be published.