इस्रो अध्यक्षांची जीवनकथा; डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन

0

लोकशाही विशेष लेख

डॉ. कस्तुरीरंगन (Dr. Krishnaswamy Kasturirangan) यांचा जन्म १९४० साली एर्नाकुलम, केरळ येथे झाला. कस्तुरीरंगन यांचे शालेय शिक्षण श्री. रामा वर्मा हायस्कुलमध्ये झाले. नंतर त्यांनी रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई येथून विज्ञानात पदवी प्राप्त केली. तसेच मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९७१ मध्ये त्यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा, अहमदाबाद येथे कार्यरत असतांना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त केली.

डॉ. कस्तुरीरंगन यांनी स्पेस कमिशनचे सदस्य आणि भारत सरकारचे अंतराळ विभागाचे सचिव म्हणून नऊ वर्षे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे निर्देशन केले. तसेच १९९४ ते २००३ पर्यंत नऊ वर्षे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे पाचवे अध्यक्षपद त्यांनी भुषवले. डॉ. कस्तुरीरंगन हे जेव्हा इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक होते, तेव्हा त्यांच्या देखरेखीखाली भारतीय राष्ट्रीय उपग्रह (INSAT-2), भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ( IRS -1A आणि 1B) आणि इतर अनेक वैज्ञानिक उपग्रह विकसित केले गेले. ते भारताच्या पहिल्या प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह (भास्कर I आणि II) प्रकल्पांचे संचालक देखील होते.

त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात अनेक महत्वाच्या मोहिमांचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) आणि जिओस्टेशनरी सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (GSLV) यांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. तसेच ‘चांद्रयान-१’ चे यशस्वी प्रक्षेपण देखील डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, ज्याला भारतीय अंतराळ विकास कार्यक्रमात एक मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारताला अंतराळ कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीतही स्थान मिळाले आहे. डॉ. कस्तुरीरंगन यांनी खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान आणि उपयोजन क्षेत्रात २४० पेक्षा अधिक शोध निबंध प्रकाशित केले. तसेच त्यांनी IRS-1C आणि IRS-1D, महासागर निरीक्षण उपग्रह IRS-P3 आणि P4 या उपग्रहांच्या निर्मिती आणि प्रक्षेपणातही आपले योगदान दिले आहे. खगोल भौतिक शास्त्रज्ञ म्हणून डॉ. कस्तुरीरंगन यांनी उच्च ऊर्जा क्ष-किरण, गॅमा किरण, ऑप्टिकल खगोलशास्त्र यांवर संशोधन केलेले आहे.

डॉ. कस्तुरीरंगन यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. डॉ. कस्तुरीरंगन हे भारतातील आणि परदेशातील अनेक महत्वाच्या वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. सध्या बंगळुरू येथील इंडियन एकॅडमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष आहेत. तसेच २००३ ते २००९ या दरम्यान ते राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. अंतराळ क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपली कामगिरी बजावली आहे. ते भारतासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या १२ सदस्यीय समितीचे प्रमुख आहेत. या समितीवर नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम विकसित करण्याची जबाबदारी आहे. डॉ. कस्तुरीरंगन यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना १९८२ मध्ये पद्मश्री, १९९२ मध्ये पद्मभूषण, २००० मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले.

आपल्या देशात अंतराळ संशोधनापेक्षा विविध प्रकारच्या विकासात्मक योजनांवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे संशोधनाच्या क्षेत्रात आपण मागे पडत आहोत. यावर मात करण्यासाठी शिक्षणामध्ये संशोधनात्मक गोष्टींना वाव देण्याची गरज आहे, असे मत डॉ. कस्तुरीरंगन यांनी सातत्याने व्यक्त केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षण प्रणाली उदयास येऊन डॉ. कस्तुरीरंगन यांच्या दृष्टीकोनातून शिक्षणामध्ये संशोधनात्मक गोष्टींना वाव मिळेल; त्याच प्रमाणे अंतराळ क्षेत्रात देखील त्यांच्या मार्गदर्शनाने भारत आपली कामगिरी उत्तम प्रकारे उंचावेल यात तीळमात्र शंका नाही.

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.