इस्रो अध्यक्षांची जीवनकथा, डॉ. जी. माधवन नायर

0

लोकशाही विशेष लेख

डॉ. जी. माधवन नायर यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९४३ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला. १९६६ मध्ये त्यांनी केरळ विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाले. १९६७ मध्ये ते थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) मध्ये रुजु झाले. TERLS मध्ये रुजु झाल्या पासून ते इस्रोच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. डॉ. माधवन नायर यांनी सप्टेंबर २००३ ते २००९ अशी सहा वर्षे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे सहावे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी २५ यशस्वी मोहिमा पार पाडल्या.

अंतराळ यंत्रणेची क्षमता वाढविण्यासाठी तसेच अंतराळ प्रवेशाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान विकसीत करण्यात पुढाकार घेतला. समाजातील शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘टेली-एज्युकेशन’ आणि ‘टेलीमेडिसिन’ सारखे अॅप्लिकेशन प्रोग्राम विकसित केले. आजपर्यंत EDUSAT नेटवर्क अंतर्गत ३१,००० पेक्षा अधिक वर्गखोल्या जोडल्या गेल्या आहेत. तसेच टेलीमेडिसिनचा विस्तार ३१५ रुग्णालयांमध्ये करण्यात आला आहे. खेडयातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे ग्राम संसाधन केंद्रासाठी योजना सुरु करण्यात देखील त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

१९९५ – ९९ या काळात डॉ. माधवन नायर लिक्विड प्रोपल्शन सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतांना डॉ. माधवन नायर यांनी आपत्ती व्यवस्थापन सहाय्य प्रणालींसाठी योजना राबवण्याव्यतिरिक्त, ऍस्ट्रोसॅट आणि चांद्रयान मोहिमेचा वापर करून बाह्य अंतराळाच्या वैज्ञानिक शोधांवर भर दिला तसेच दळणवळणासाठी उपयुक्त स्पेसक्राफ्ट, रिमोट सेन्सिंग आणि अॅप्लिकेशन प्रोग्राम्सशी संबंधीत नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वात अमुल्य असे मार्गदर्शन देखील केले.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात डॉ. माधवन नायर यांनी द्विपक्षीय सहकार्यासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले आहे. फ्रान्स, रशिया, ब्राझील, इस्त्राइल इत्यादी महत्वाच्या देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकारी करारांवर काम करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. तसेच १९९८ पासून युनायटेड नेशन्स कमिटी ऑन पीसफुल यूज ऑफ आऊटर स्पेस (UN-COPUOS) च्या S & T उप समिती मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानामुळे डॉ. माधवन नायर यांना १९९८ मध्ये पद्मभूषण आणि २००९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. रॉकेट तंत्रज्ञानातील आघाडीचे वैज्ञानिक म्हणून डॉ. नायर यांची ओळख सर्वश्रुत आहे. बहुस्तरीय उपग्रह प्रक्षेपण वाहकांच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहक, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण वाहक आदी प्रकल्पांतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अंतराळ प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आज जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवत आहे. विशेषत: प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (PSLV) च्या विकासाचे नेतृत्व केले, जे भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मुख्य वाहन बनले आहे. GSLB साठी क्रिटीकल क्रायोजेनिक इंजिनच्या डिझाइन आणि विकासामध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. अशा प्रकारे डॉ. माधवन नायर यांची इस्रो मधील कारकीर्द ही प्रेरणादायी आहे.

 

 

 

 

 

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.