ॲड. उज्वल निकमांवरील टीका जळगाव जिल्ह्यासाठी वेदनादायी..!

भाजपतर्फे खासदारकीची उमेदवारी, निवडणुकीत पराभव आणि विशेष सरकारी वकीलपदाची नियुक्ती टीकेच्या फेऱ्यात

0

लोकशाही कव्हर स्टोरी

 

  • अचानक भाजपची उमेदवारी मिळाली कशी?
  • जळगाव ऐवजी मुंबई उत्तर-मध्य मतदारा संघातून उमेदवारी देण्याचे कारण?
  • लोकसभा निवडणुकीत विजय झाला असता तर टीका कमी झाली असती?
  • भाजपकडून ॲड. निकमांचा गेम केला गेला?
  • ॲड. निकम यांच्या निष्पक्ष प्रतिष्ठेला धक्का?
  • ॲड. उज्वल निकमांवर भाजप राजकीय पक्षाचे शिक्कामोर्तब?
  • राजकीय सत्तेची महत्त्वकांक्षा ॲड. निकमांना भोवली?
  • विशेष सरकारी वकीलपदी पुन्हा नियुक्ती झाली ती नाकारायला हवी होती?

 

जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध विधीज्ञ महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांना भाजपतर्फे अचानक मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भाजपतर्फे निकमांची उमेदवारी घोषित केली तेव्हा उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. तसेच अनेकांकडून टिकेचा सूरही उमटला. टिकेचा सूर उमटण्याचे कारण असे की, ॲड. निकम यांच्यात भाजपची आयडियालॉजी दडली होती. याबाबत कुणालाही कल्पना नव्हती, परंतु भाजपची उमेदवारी संदर्भात ऑफर आली, तेव्हा ती ‘स्वीकारायची की नाही’ याबाबत घरातील कुटुंबात मतदान झाले आणि स्वीकारण्याच्या बाजूने मताधिक्य झाले. लोकशाहीत मताधिक्याचा निर्णय मान्य केला, असे निकम जरी सांगत असले तरी ते पटणारे नाही. परंतु भाजपला अॅड. उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देऊन ‘स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार मुंबईतून हमखास विजय होईल’ असे वाटले होते. परंतु भाजपमधील अंतर्गत गटबाजीने ॲड. उज्वल निकमांचा घात केला आणि ते थोड्या मतांनी पराभूत झाले.

 

पाच वर्षांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ॲड. उज्वल निकम यांना ऑफर दिली होती. त्यावेळी ॲड. निकमांनी ती ऑफर नम्रपणे नाकारली होती. “निवडणुकीच्या राजकारणातच पडण्याची माझी इच्छा नाही”, असे निकमाने सांगितले होते. त्यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघ आपल्या जिल्ह्यातील मतदार संघ होता. तेथून निवडणूक लढवण्याचे निकमांनी का टाळले? २०१९ ला मोदी लाट होती. त्या लाटेत आपण निवडून येणार नाही, याची भीती निकमांना वाटली असावी. म्हणून त्यांनी जळगाव मधून लढण्याचे टाळले, असा जिल्ह्यात एक मतप्रवाह आहे. २०१९ प्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा होईल, म्हणून भाजपची ‘मुंबई’ या नवख्या मतदारसंघातून निवडणूक लढवली का? परंतु देशात मोदीला तर नव्हतीच, आणि महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यात ॲड. उज्वल निकमांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या पराभवाचे भांडवल करून भाजप व उज्वल निकम यांचेवर टीकेची झोड उठली.

 

ॲड. उज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मधून उमेदवारी जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर ॲड. निकम यांना लक्ष करण्यात आले. अनेक प्रकारचे व्हिडिओ विविध डिजिटल पोर्टल मधून व्हायरल झाले. महाराष्ट्राचे १९९३ पासून विशेष सरकारी वकील असलेले ॲड. उज्वल निकम हे ‘छुपा रुस्तम’ निघाले, अशी टीका केली. ‘राजकीय सत्तेची असलेली महत्त्वकांक्षा’ त्यात दडलेली होती, ती या निमित्ताने दिसून आली. राज्यातील तसेच देशातील घडामोडींवर एक ‘तज्ञ वकील’ म्हणून ते अनेक वेळा भाष्य करायचे. आता त्यांच्या ‘भाष्य करण्याबाबत शंका’ निर्माण होते, अशीही टीका केल गेली; अद्यापही केली जात आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत कोर्टाच्या टिकेवर सावध मत ॲड. निकम यांनी व्यक्त केले, किंबहुना महायुतीला पोषक असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांच्या भाषाबाबत मनात शंका येत असली तरी निकमांवर कोणी टीका केली नाही. आता भाजपतर्फे निवडणूक लढविण्यानंतर लोक उघड उघड टीका करीत आहेत.

 

निर्भय बनो संघटनेचे नेते ॲड. असीम सरोदे यांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन वीस प्रश्न ॲड. उज्वल निकम यांना दिले होते. त्यांची त्यांनी उत्तरे द्यावीत, असे जाहीरही केले होते. जळगावच्या भर जाहीर सभेत ॲड. उज्वल निकमांवर टीका करून मुंबईमधून निवडणूक लढवणारे ॲड. निकम यांचा पराभव होणार असल्याची टीका केली होती. ॲड. असीम सरोदे यांनी विचारलेल्या २० प्रश्नांचा उहापोह येथे करीत नाही. कारण तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. परंतु कुठल्याही टिकेला सविस्तर उत्तर ॲड. निकमांकडून अपेक्षित होते, परंतु ते निकमांनी दिलेले नाही. त्यामुळे जळगाव जिल्हावासियांना त्याबाबत वाईट वाटतेय. कारण अॅड. निकम यांनी टीकेला उत्तर द्यावे की, नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु अॅड. निकम यांचे जीवन एक सेलिब्रेटी म्हणून व्यक्तिगत राहिलेले नाही. त्याचे जीवन सामाजिक बनले आहे.

 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने अॅड. निकम यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून आतापर्यंत एक वकील म्हणून त्यांची निष्पक्ष अशी प्रतिमा होती. भाजपतर्फे निवडणूक लढवण्यामुळे त्यांच्यावर ‘भाजप पक्षाचा शिक्कामोर्तब’ झाला. त्यांची निष्पक्ष प्रतिमेला आता तडा गेला आहे. ‘भाजपचे वकील’ म्हणून आता त्यांची ओळख राहील. भाजपने त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन आपला डाव साधला हे ठीक आहे, परंतु पराभवानंतर त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर घेऊन त्यांना खासदारकी बहाल करावी, परंतु सद्यस्थितीत तर तशा काही भाजपतर्फे हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही. भाजपवर ‘यूज अँड थ्रो’चा सतत आरोप होतोय. त्याच पद्धतीप्रमाणे ॲड. उज्वल निकमांचे झाले, असे जळगाव जिल्हावासियांना वाटत असल्यास त्यात नवल काय…!

 

 

विशेष सरकारी वकीलपद पुन्हा स्वीकारायला नको होते!

“ॲड. उज्वल निकम १९९३ पासून महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ कालावधीत अनेक खटले त्यांनी लढवले आणि त्यात ते यशस्वी झाले. २६/११ च्या बॉम्बस्फोट खटलातील त्यांचे यश ख्याती प्राप्त आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा नावलौकिक झाला. त्यांची प्रतिमा उजळली. महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता वाढले म्हणूनच भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा त्यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती ॲड. निकमांनी ‘स्वीकारली नसती’ तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती. परंतु त्यांनी ते स्वीकारल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.