धक्कादायक: नऊ वर्षीय भाचीचा मामाने केला विनयभंग

नराधम मामाला नागरिकांनी दिला चोप

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

चाळीसगाव येथील एका गावातून धक्कादायक घटना समोर आलीय. सख्या मामाने आपल्या नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केला. या चिमुकलीने मामाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला.

गुन्हा दाखल

जवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना हा प्रकार समजल्यावर परिसरातील ग्रामस्थांनी नराधम मामाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात मामाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मामाला अटक करण्यात आली आहे.

सॅन्डलचे दिले आमिष

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय बालिका आपल्या आई- वडिलांसमवेत राहते. रविवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास या बालिकेचा मामा समाधान उर्फ सोमा अभिमान भिल हा घरी आलेला होता. बाजारातून सॅन्डल घेऊन देतो, असे सांगून तो भाचीला घेऊन गेला. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी परत आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला असता, परिसरातील एका शेतात काम करणाऱ्यांनी समाधानला पकडून ठेवल्याचे व पीडित बालिका रडत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

बालिकेने काढला पळ

आपल्याला मामा समाधान याने नवीन सॅन्डल घेऊन देण्याच्या बहाण्याने लिंबूच्या बागेत नेऊन विनयभंग केल्याचे बलिकेने सांगितले. मात्र, बालिकेने तेथून पळ काढून जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांना मामा त्रास देत असल्याचे सांगितल्याने खरा प्रकार उघडकीस आला.

नराधम मामा पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचत नराधम मामाला त्यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यासह इतर विविध कलमान्वये संशयित समाधान भिलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.