Breking : राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग ; काँग्रेस नेते अहमद पटेल गडकरींच्या भेटीला

नवी दिल्ली :महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आहे.  आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात.  त्यामुळेच या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सुमारे तासभर चालली. बाहेर येताच अहमद पटेल यांच्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र ‘आपण देशातल्या शेतीच्या प्रश्नावर गडकरी यांना भेटलो. महाराष्ट्राच्या राजकारणावर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही,’ असे ते म्हणाले. नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री असताना पटेल यांनी शेतीच्या प्रश्नावर काय चर्चा केली हा प्रश्न गुलदस्तातच आहे. त्यामुळेच ही भेट महाराष्ट्रातल्या सरकारस्थापनेसंदर्भातल्या पेचाशीच संबंधित होती, असे जाणकारांचे मत आहे. राज्यातल्या सत्ता स्थापनेपासून कॉंग्रेसने दूर रहावे, शिवसेनेला कोणताही पाठींबा देऊ नये, अशी चर्चा नितीन गडकरी व अहमद पटेल यांच्यात झाल्याचीही चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेवर चर्चा झाली होती. राज्यात शिवसेना-भाजपा महायुतीला बहुमत मिळालं असतानाही या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १४ दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.

Comments are closed.