भडगाव शहरात मोकाट कुत्र्यांसह गुरांचा धुमाकूळ

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरात मोकाट कुत्रे,  मोकाट गुरे, जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. रात्री – अपरात्री तर या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही. याबाबत कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नसल्याने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात मोकाट कुत्रे, मोकाट गुरे, जनावरांची एकूण संख्या किती, याची कल्पना पालिका प्रशासनाला नाही. शहरातील सर्व भागात या मोकाट प्राण्यांचा उपद्रव सुरु आहे. रस्त्यावरून पायी चालणारे पादचारी शाळकरी लहान मोठे विद्यार्थी- विद्यार्थिनी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्यांवर दबा धरून बसलेले कुत्रे अचानक हल्ला करतात. वाहनचालकाने या अचानक झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला तर त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुत्रे पळत सुटतात. त्यातच दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरते व अपघात घडत आहे. या अपघातात रस्त्याने चालणाऱ्या निरपराध आबालवृद्धांवर जखमी होण्याची वेळ येते. अनेक नागरिक व वाहनचालकांना याचा चांगलाच अनुभव आहे. कुत्र्यांच्या टोळक्यामुळे पहाटे फिरण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बस स्थानक परिसर, मेन रोड, पोलिस स्टेशन समोर, भागवत कॉलनी, मटण मार्केट परिसर, महादेव गल्ली, खोल गल्ली, सोनार गल्ली, जकातदार गल्ली, बाजार चौक, टोंनगाव, यशवंत नगर या ठिकाणी मोकाट प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. मोकाट जनावरे तर थेट पाचोरा रस्ता, चाळिसगाव रस्ता, बसस्थानक समोर, मेन रोड, प्रियांका टाकी जवळ, हनुमान मंदिर जवळ ठाण मांडून बसलेले असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी अवजड वाहनांनाही ते घाबरत नाहीत. दिवसभर जनावरांचे हे ठिय्या आंदोलन सुरूच असते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. या मोकाट जनावरांनी भाजी विक्रेत्यांसमोरील भाजीपाला जबरदस्तीने ओढून नेण्यात ही मोकाट जनावरे माहीर आहेत.

भाजीपाला विक्रेत्याने अशा जनावरांना काठीचा धाक दाखवून हुसकाविण्याचा प्रयत्न केल्यास ती इतरत्र सैरावैरा पळू लागतात. त्यातच नागरिकांना व महिलांना या जनावरांचा उपद्रव सहन करावा लागतो. ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी नगरपालिकेने घंटागाड्या सुरु केल्या आहेत. मात्र काही नागरिक शिळे अन्न, घंटागाडीत न टाकता दररोज घरांसमोर मोकळ्या जागेत टाकत असतात. त्यावर डुकरे, मोकाट कुत्री व जनावरे तुटून पडतात. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर ते हल्ला करतात. मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने शहरात सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. या बाबत नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.