सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयात त्याच वर्गात तेच मित्र २६ वर्षांनी आले पुन्हा एकत्र

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालयात सन १९९५-९६ मधील इयत्ता दहावीचे ड तुकडीतील माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षानंतर आपल्याच शाळेत, आपल्याच वर्गात पुन्हा एकत्र जमले होते. या वेळी मित्रमैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या स्वतःच्याच बेंचवर पुन्हा बसून गप्पा गोष्टींमध्ये रमले. तसेच १० वी नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा क्रम इतरांसमोर मांडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळच्या दहावी ड च्या वर्गशिक्षिका जयश्री पूर्णपात्री, गणिताचे शिक्षक व माजी प्राचार्य शिवचरित्रकार सुनील पाटील, ९ वी च्या वर्गशिक्षिका छाया बिऱ्हाडे, कलाशिक्षक सुरेश न्हावी हे देखील वर्गात उपस्थित होते. सर्व गुरुजनांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आयोजक विद्यार्थ्यांनी  शिक्षकांचे स्वागत केले.

मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, छत्तीसगड, धुळे, पारोळा, नंदुरबार, शहादा, चाळीसगाव येथे नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपल्या शाळेची लागलेली ओढ, मित्र भेटीची उत्सुकता सोशल मीडियाद्वारे तब्बल २६ वर्षानंतर पूर्ण झाली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव कथन करून भावना व्यक्त केल्या. आशिष पाटील यांनी शाळेविषयीची कविता सादर केली. बाळकृष्ण खैरनार, स्मिता वाणी व वैशाली पाटील हे कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत परंतु त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सर्व मित्रमैत्रिणींशी संवाद साधला.

व्याख्याते सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले तसेच देशहित व मानवतेची भावना ठेवून आपण कार्य करावे असे आवाहन केले. कुठलीही संकट आले तरी त्या संकटावर मात कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. इतर शिक्षकांनीही मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी तर किशोर सोनवणे यांनी आभार मानले. सर्व उपस्थित मित्र मैत्रिणींचा शिक्षकांसह एक गृप फोटो कार्यक्रमात घेण्यात आला. सोमनाथ पाटील यांच्या वतीने तो फोटो फ्रेम करुन त्याचदिवशी सर्वांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. शेवटी सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. सोमनाथ पाटील व योगेश शिंपी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमास अनिता बोरसे, मीना शिंपी, पूजा भंडारी, वंदना सोनजे, वैशाली कासार, मंगला कासार, कल्पना, कासार, मनीषा पाटील, आदेश जैन, आशिष पाटील, रवींद्र दुसे, प्रकाश दुसे, प्रा. किशोर पाटील, किरण महाजन, जितेंद्र वजीरे, किरण पाटील, प्रदीप शिंदे, धरमसिंग पाटील, हंसराज पाटील, लहू पाटील, मनोहर भोई व ललित मोरेस्कर यांनी उपस्थिती देऊन सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.