बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; ४४६ नवे बाधित आढळले

0

खामगाव (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांनाच आज जिल्ह्यात पुन्हा 446 नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. काल बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती असून जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा एकूण आकडा 19980 झाला आहे. सद्यस्थितीत जवळपास 2492 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजवरचा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 195 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील चोवीस तासात म्हणजेच बुधवार मध्यरात्री पर्यंत जिल्ह्यात बुलढाणा 55, खामगाव 66, शेगाव 60, देऊळगाव राजा 39, चिखली 40, मेहकर 07, मलकापूर 43, नांदुरा 49, लोणार 01, मोताळा 20, जळगाव जामोद 21, सिंदखेड राजा 24, संग्रामपूर 15, सिद्धिविनायक हॉस्पिटल बुलडाणा 03, सहयोग हॉस्पिटल 03 असे एकुण 446 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाने बुलडाणा जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे स्वॅब नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. दरम्यान, दैनंदिन कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहे. लसीकरण मोहिम सुध्दा युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. असे असताना रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून दररोज 300 ते 400 नवीन रुग्णांची भर पडत आहे.

जोपर्यंत कोरोनावर मात करता येत नाही तोपर्यंत नागरिकांना खबरदारीने वागण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाची लस सुद्धा उपलब्ध झाली असून काल 1122 नागरिकांना लस दिली गेली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 15 खासगी हॉस्पिटलमध्ये लवकरच लस दिली जाणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर, गर्दीत जाणे टाळणे, नियमितपणे हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे असे साधे सोपे उपाय करून कोरोना नियमांचे पालन करावे व स्वतासोबत इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. कोरोनाने घाबरून जाण्यापेक्षा जबाबदारीने वागणे मात्र अत्यावश्यक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.