पहूर कसबे येथे भीषण पाणीटंचाई

0

टँकरद्वारे अपुरा पाणीपुरवठा ; हातपंपावर लागताहेत रांगा

*पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र

* देवळी -गोगडी धरणाची पातळी खालावली

पहूर . ता. जामनेर ;– पहूर कसबे येथे दुष्काळ वणव्यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत .१ मे पासून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले होते , तशी लेखी पत्राद्वारे मागणीही तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती . मात्र गटविकास अधिकारी व तहसिलदार यांनी धरणांवर भेट दिली तेव्हा पाणीसाठा पुरेसा होता . आता केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने पुन्हा ग्रामपंचायतीने टँकर्सची मागणी करणे गरजेचे आहे . पाण्यासाठी महिलांना हातपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत .भू -अंतर्गत जलपातळी प्रचंड प्रमाणात घटत असून हातपंपही टप्पे घ्यायला लागले आहेत . काही शेतकरी बैलगाडी द्वारे शेतातील विहीरीतून पाण्याच्या टाक्या भरून आणत आहेत . देवळी -गोगडी धरणाची पातळी खालावल्याने आता पंचवीस दिवसातुन नळाला पाणी येत आहे .

——पाणी विक्रीला सुगीचे दिवस —-
तीव्र उन्हाळ्यामुळे जारद्वारे शुद्ध व थंड पाणी 30 रुपये प्रति कॅन ( 20 लिटर्स )प्रमाणे विक्री होत आहे . दररोज 4 प्रकल्पांद्वारे सुमारे वीस हजार लिटर्स पाण्याची विक्री होत आहे . प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे .

ग्रा.प. ने पत्रव्यवहार करावा – ए .बी.जोशी ,गटविकास अधिकारी
पहूर कसबे ग्रामपंचायतीने आम्हांस टॅंकर्सची मागणी केली होती .परंतू आम्ही धरणांवर पाहणी केली तेव्हा पुरेसा साठा देवळी गोगडी धरणांत होता . आता पुन्हा ग्रामपंचायतीने पत्र पाठवावे , म्हणजे उपाययोजना करता येईल .

टँकरसाठी प्रशासनाकडे लेखी मागणी – ज्योती शंकर घोंगडे, सरपंच , पहूर – कसबे

पहूर कसबे गावाला भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत .टँकरसाठी प्रशासनाकडे लेखी मागणी केलेली आहे . धरणातील पाणी संपताच आम्ही टॅंकर ने पाणीपुरवठा करू ,असे गटविकास अधिकारी श्री . जोशी यांनी सांगितले होते , मात्र अजूनही टॅंकर आलेले नाहीत . आज आम्ही गावात नळाला पाणी येणार नसल्याबाबत दवंडी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.