वीरपत्नींसाठी उद्यापासून मोफत एसटी प्रवास

0
मुंबई ;- शहीद जवानांच्या पत्नींना उद्यापासून (महाराष्ट्र दिन) एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. १ मे २०१८ रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते बस सवलतीचे ओळखपत्र वीरपत्नींना देऊन या योजनेचा शुभारंभ होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत ही सवलत योजना सुरु करण्यात आली आहे.
शहीदांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर यापुढे शहीदांच्या वारसांना एसटीत नोकरीही देण्यात येणार आहे. या योजनेला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी प्रामुख्याने एसटीनेच प्रवास करावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे. कारण, यामुळे नागरिकांकडून देशसेवेसाठी हातभार लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
उद्या राज्याभरातील ५१७ वीरपत्नींना मोफत एसटी प्रवासाचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रावर एका बाजूला शहीद जवानाचा फोटो आणि हुद्द्यासह संपूर्ण माहिती तर दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक आणि संपूर्ण माहिती छापलेली असेल. उद्या होणाऱ्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी एसटीकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे एसटीच्या सुत्रांकडून कळते.
विशेष म्हणजे, आपली आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगत काही वीरपत्नींनी ही सवलत स्वतःहून नाकारल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.