३ मे नंतर लॉकडाउन उठणार की लांबवणार ?; पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार

0

नवी दिल्ली : करोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. येत्या ३ मे रोजी देशव्यापी लॉकडाउन लागू होऊन ४० दिवस होणार आहेत. हा लॉकडाउन संपण्यास सहा दिवस उरले असताना आज, सोमवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

देशावरील करोनाचे संकट संपलेले नसून देशातील प्रमुख शहरांमध्ये ते आणखी गंभीर झाले आहे. या परिस्थितीत करोनावर मात करण्यासाठी पुढची रणनीती काय असेल, यावर मुख्यमंत्र्याच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

करोनाशी लढण्यासाठी भारताची रणनीती काय असावी, यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाउन आणखी पुढे वाढवायचा की नाही, यावर चर्चा होईल. करोनाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून अपेक्षित आर्थिक मदत तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे मिळत नसल्याची राज्यांची तक्रार आहे. लॉकडाउनच्या काळात ४० दिवस ताटकळलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांमध्ये पाठवण्यावर राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सहमती होत असून त्याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी या बैठकीत मुख्यमंत्री आग्रह करू शकतात.

राज्यात जिल्हानिहाय निर्णय?
राज्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा देण्यात आली आहे. त्याबाबतचे अहवाल रोज माझ्याकडे येत आहेत. राज्यात सध्या ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच लॉकडाऊनचे पुढे काय करायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

करोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिलनंतर सरकारने काही व्यवहार सुरू करण्यास अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरू आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या खुल्या होणार नाहीत. पण काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मेनंतर काही मोकळीक देता येईल का, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.