स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या अस्थींचे विसर्जन

0

                               चांगदेव येथे पदाधिकार्‍यांची उपस्थिती : कार्यकर्त्यांनी घेतले अस्थाकलशाचे दर्शन
मुक्ताईनगर, दि. 3 –
भाजपाचे ज्येष्ठ नेते कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थीचे चांगदेव येथील तापी पुर्णा नदीच्या पवित्र संगमावर त्यांचे पुत्र आ. आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.
तत्पूर्वी एकनाथराव खडसे यांच्या खडसे फार्म येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
येथे भाऊसाहेब फुंडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला तेथे सर्व कार्यकर्त्यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले.
यावेळी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले, राजकारणासोबतच पारिवारिक संबंध दृढ असलेल्या, विदर्भीय राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला. भाऊसाहेब यांच्या रूपाने एक सच्चा मित्र, सच्चा स्नेही आणि चांगला मार्गदर्शक आम्हाला सोडून गेला आहे
प्रमोदजी महाजन, भाऊसाहेब, गोपीनाथजी मुंडे आणि मी असा एक ऋणानुबंधच या काळात जुळला होता. आमचे संबंध केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता पारिवारिक संबंध होते. आम्हा चौघांचेही एकमेकांच्या परिवारावर जिवापाड प्रेम होते. माझ्या जीवनात मानसिकरित्या व्यथीत होण्याचा दुःखद प्रसंग म्हणजे स्व.निखिलचे आम्हाला सोडून जाणे. त्यावेळी भाऊसाहेब केवळ सात्वंनासाठी न येता कोथळी येथील निवासस्थानी थांबूनच राहिले होते. भाऊसाहेब माझ्या प्रत्येक वाढदिवसाला स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा देत असत भाऊसाहेबांमध्ये आणि माझ्यात आणखी एक ऋणानुबंध आहे तो म्हणजे आम्हा दोघांची सासुरवाडी ही बुलढाणा जिल्ह्यातील एकाच गावाची आहे.
भाऊसाहेबांनी आपले पुर्ण आयुष्य भाजपाच्या वाढीसाठी खर्ची घातले आणि आता सत्ता आल्यानंतर भाऊसाहेब असे अचानक निघून गेले त्यांच्या अचानक जाण्यामुळे महाराष्ट्र राज्य एका विकास पुरुषास मुकला आहे तसेच भाजपाची अपरिमित हानी झाली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. राजेंद्र फडके यांनी भाऊसाहेबांच्या आठवणीना उजाळा दिला.
खासदार रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, महानंद अध्यक्षा मंदाताई खडसे, जि.प उपाध्यक्ष नंदु महाजन, जि. प माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, सरचिटणीस सुनील नेवे, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड अध्यक्ष भागवत टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर प.सं.सभापती शुभांगी भोलाणे, रमेश ढोले विलास धायडे, राजू माळी, जयपाल बोदडे, वैशाली तायडे, विकास पाटील, योगेश कोलते,पांडुरंग नाफडे उपस्थित होते.
अस्थिकलशाचे विसर्जन
स्व. भाऊसाहेबांच्या अस्थिकलशाचे यावेळी त्यांचे नातेवाईक व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब अमर रहे च्या घोषणा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.