शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल अखेर पाडण्याचे काम सुरु

0

दोन्ही बाजूच्या वाहनधारकांची कोंडी

जळगाव :- जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याच्या कामास अखेर आज सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली.
सदर शिवाजीनगर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु असल्यामुळे आज सकाळपासून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीनगरमधून शहरात येणाऱ्या वाहनधारकांना तब्बल दीड तास थांबून राहावे लागले. तसाच प्रकार जळगाव शहरातून शिवाजीनगरमध्ये जाणाऱ्या वाहन धारकांची परिस्थिती झाली.

ब्रिटिशांकडून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी शिवाजीनगरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. या पुलाची कालमर्यादा संपुष्टात आलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलाच्या पहिल्या टप्प्यात पुलावरून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या खोदकामाला आजपासून सुरुवात करण्यात आली.

शिवाजीनगरच्या या ब्रिटिशांकालिन रेल्वे उड्डाणपुलावरून दररोज हजारो नागरिकांना ये-जा करावा लागतो. आज हा पूल तोडण्यात आल्याने शिवाजीनगरातून ये-जा करण्याऱ्या नागरिकांची चांगलीच फरफट झाली. या ठिकाणाहून शहरात येण्यासाठी शनिमंदिर व शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल हे दोन मार्ग होते; परंतु आता हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे या ठिकाणावरील नागरिकांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

शिवाजीनगरामधून शहरात ये-जा करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाची सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. मात्र, प्रशासनाने कोणतीही सुविधा केलेली नसल्यामुळे नागरिकांना आता अमळनेर रेल्वे चौकी मार्ग तसेच असोदा रेल्वे गेटचाच पर्याय राहिल्यामुळे नागरिकांना मोठा फेरा सहन करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.