शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीची छापेमारी

0

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक  यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी जवळपास ८ च्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं.

प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.