विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज

0

भुसावळात यावल नाका, वरणगाव नाका अन् नवोदयजवळ ‘चेक पोस्ट’

भुसावळ (प्रतिनिधी)- : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले असून शहरातील यावल नाक्यासह वरणगाव नाका आणि नवोदय विद्यालयाजवळ  २४ तास वाहनांच्या तपासणीसाठी स्थिर पथक नियुक्त करण्यात आले असून चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर्स व फलक जप्त करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरीकांना तेथे जावून तक्रारी करता येणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर उमेदवारांचा प्रचार व प्रसार करणार्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. तसेच सभांची माहिती घेणे, तक्रारींचे निवारण अशी जबाबदारी फिरत्या पथकांकडे सोपवण्यात आली असून विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे,स्थिर पथक, फिरते पथकासोबत चित्रीकरण आणि छायाचित्रकारांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. भरारी पथकात प्रशासनाच्या एका कर्मचार्यासोबत तीन पोलिस व एक व्हिडिओग्राफर असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार कायद्याचे पालन करून पोलिसांनी वाहनांची तपासणी करावी. त्याचप्रमाणे फिरत्या पथकांनी सतर्क राहून आपली जबादारी सुरळीत पार पाडावी, अशा सूचना प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिल्या आहेत. यावेळी  सर्व विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या काळात सोशल मिडीयावर उमेदवाराचा प्रचार व प्रसार करणार्या तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण करणार्यांवर प्रशासनातर्फे करडी नजर ठेवली जाणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा पसरवल्यास वा आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ पसरवणारा मजकूर टाकल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.