लाभार्थ्यांना धान्यापासून ठेवले वंचित! वनोलीच्या रेशन दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

0

यावल : तालुक्यातील वनोली येथील रेशन दुकानदारास लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे चांगलेच भोवले आहे. येथील अंबादास धनसिंग पाटील यांचे रेशन दुकान क्रमांक ७९ यांचे प्राधिकार पत्र (परवाना) रद्द करण्याची कारवाई आज जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केली आहे. या कारवाईमुळे इतर रास्त भाव दुकानदरांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील रेशन दुकानांची तपासणी मोहीम सुरूच राहील असेही श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले.

रेशन कार्ड धारकांना धान्य कमी देणे, यादीत नाव असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे, रेशन दुकानदारास विचारणा केली असता समिती सदस्यांना धमकी देणे आदी प्रकारामुळे अंबादास धनसिंग पाटील यांचे रेशन दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द केली आहे. दरम्यान, हे दुकान आता मौजे कोसगाव येथील स्वस्त दुकानदार सुभाष तायडे यांच्या स्वस्त धान्य दूकानास तत्काळ जोडण्याची कार्यवाही करण्यास यावल तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभाग लाभार्थ्यांच्या आलेल्या तक्रारींवरून संबंधित दुकानदार, त्यांचे लाभार्थ्यांशी चौकशी करीत आहे. लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहे. वनोली येथील दुकानदारांबाबत विविध प्रकारच्या तक्रारी होत्या. यावल तहसीलदारांना दुकानदार पाटील यांना नोटीस बजावून वरील बाबींबाबत खुलासा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. खुलाशात दुकानदाराने मी आत्महत्येची धमकी दिलेली नाही, नियमित धान्य वाटप करतो, शासनाच्या अटींचे पालन करतो ई पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करतो असे म्हटले आहे. दुकानदाराने सादर केलेला खुलासा सयुक्तिक नाही. यामुळे वितरणाचे विनियमन आदेश 1975 मधील तरतुदींचा व प्राधिकारपत्रातील अटी व शर्तीचा भंग केल्याने दुकानदार अंबादास पाटील यांचे दुकान क्रमांक 79 चे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.