राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत जळगांवची सर्वोत्तम कामगिरी

0
महाराष्ट्र संघास विजेतेपद प्राप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी/
लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया, लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने वसई (मुंबई) या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी केली. यात कनिष्ठ संघाला सुवर्ण व वरिष्ठ संघाने कांस्य विजेतेपद प्राप्त झाले. देशभरातून एकूण १४ राज्याचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या पुरुष वरिष्ठ संघांचे कर्णधारपदी नेतृत्व करण्याची संधी चाळीसगांवच्या रोहित वाकलकर यांना मिळाली. या संघात भावेश चौधरी, महेश नन्नवरे यांनी जळगांव संघाकडून चमकदार कामगिरी करुन तृतीय क्रमांकाचे विजेतेपद प्राप्त करुन संघास कांस्य पदक प्राप्त मिळवून दिले. कनिष्ठ संघाने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या कनिष्ठ संघात चाळीसगावच्या अनंत पाटील यांचा मोलाचा सहभाग राहिला. खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
लंगडी हा अस्सल मराठमोळा खेळ असला तरी म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड, भूतान येथे संघ तयार होत असल्याची माहिती राज्य लंगडी असोसिएशनचे सचिव चेतन पागावाड यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र, दमण, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, दादरा नगर हवेली अशा विविध  राज्यांचा या स्पर्धेदरम्यान सहभाग राहिला.
नुकतीच मागील आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने लंगडी या खेळास राज्यस्तरापर्यंत आयोजित केल्या जाणाऱ्या शालेय क्रिडा स्पर्धा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र लंगडी खेळाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती जळगांव लंगडी कॉर्पोरेशनचे सचिव राहुल वाकलकर यांनी दिली. लंगडी खेळामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनत असून लंगडी या देशी खेळास प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून प्राधान्य देण्यावर भर देणार असल्याचे लंगडी असोसिएशनच्या अध्यक्षा प्रा.डॉ अस्मिता पाटील यांनी सांगत खेळाडूचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.