राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत 54 लाभार्थ्यांना 12 लाख 80 हजारांच्या मदतीचे वाटप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने होणारी हानी अपरिमित आहे. हे दुःख पेलून कुटुंबासाठी नव्या उमेदीने वाटचाल करावी. यासाठी राज्य शासन आणि या विधवा महिलांचा भाऊ म्हणून मी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील 52 विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी 20 हजार तर आत्महत्याग्रस्त दोन शेतकर्‍यांच्या पत्नींना प्रत्येकी एक लाखाच्या मदतीचे वाटप आज धरणगाव येथे पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी 20 हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील 52 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे एकूण 10 लाख 40 हजार रूपयांचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात या  योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली.

यात तालुक्यातील रेल, पाळधी, पिंप्री, वराड, भोद, बोरखेडा, पिंपळे, गारखेडा, नांदेड, सोनवद, विवरे, साकरे, गंगापुरी, झुरखेडा, हनुमंतखेडा, भवरखेडा, हिंगोणे, चांदसर, कल्याणे, चावलखेडा, जांभोरे व फुलपाट येथील महिलांचा समावेश होता. याप्रसंगी दिवाळी सणानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते या महिलांना मिठाई आणि साडी भेट देण्यात आली. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 2 शेतकर्‍यांच्या पत्नींनाही शासकीय नियमानुसार प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत आणि पिठाची गिरणी देण्यात आली.

या सर्व 54 महिलांचे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मदतीचा प्रस्ताव सादर करून त्यास लवकरात लवकर मंजूरीचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

या कार्यक्रमाला गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पी. एम. पाटील, राजेंद्र महाजन, पप्पू भावे, भगवान महाजन, भानुदास विसावे आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.