रक्षाबंधनासाठी बहरला बाजार !

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण रविवारी आल्यामुळे शुक्रवारी बाजारपेठ बहरल्याचे चित्र दिसून आले. पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात पुन्हा चैतन्य परतल्यासारखे दिसू लागल्याने व्यावसायिकांनादेखील काहीसा दिलासा मिळाला. सणाच्या आधी आलेले शुक्रवार आणि शनिवार हे दोन्ही दिवस बाजारात भगिनीवर्गाची विशेष उपस्थिती दिसून आली. बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण अवघ्या २ दिवसांवर येवून ठेपल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत निरनिराळय़ा रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. तर पेणच्या बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी मुलींसह महिलावर्गाची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बहिणीच्या आरोग्याची काळजी घेत बहिनीला बाजारात  न पाठवता भाऊराया स्वतः राखी खरेदी करतानाचे दिसत होते.

संपूर्ण देश जरी जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कॅलेंडरवर चालत असला तरी बाजार हा नेहमीच भारतीय कालगणनेच्या चैत्र ते फाल्गुन या तिथ्यांवरच चालतो, हे पुन्हा राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अधोरेखित झाले. भारतीय जनमानस हे सण-उत्सवाच्या कालावधीत आपसूकपणे खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्याच तिथींच्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात चैतन्य पसरते. रक्षाबंधनातून या चैतन्याची चुणूक दिसून येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.