युपी- बिहारच्या धर्तीचे भुसावळातील हत्याकांड

0

भुसावळ हे गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी रेल्वे जंक्शनमुळे प्रवाशांना लुटणे, प्रवाशांच्या बॅगा लांबविणे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरणे, पाकिट मारणे आदी प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती सतत डोके वर काढत असते. फारच झाले तर एखाद्या प्रवाशाला चाकूने भोसकून त्याची बॅग घेऊन पसार होण्याच्या घटना घडत असतात. परंतु एखाद्याच्या घरावर जाऊन गोळीबार करुन, चाकूचे वार करुन पाच जणांची सामहिक हत्या करणे म्हणजे मन सुन्न करणारी घटना होय. उत्तरप्रदेश, बिहार या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना राजरोसपणे होतात हे आपण दूरदर्शनवर पहातो, वृत्तपत्रात वाचतो. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविणार्‍या राज्यात आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात जेव्हा होते तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे. त्याला वेळीस ठेचले पाहिजे. भुसावळ शहरातील सामुहिक हत्याकांड हे पोलीस प्रशासनापुढे एक मोठे आव्हानच होय. विजयादशमीच्या आदल्या दिवशी भुसावळ नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक रविंद्र खरात उर्फ हंप्या यांच्या समता नगरातील घरावर तीन- तीनच्या गटाने चालून जातात गोळीबार करतात, चाकूचाही वापर करुन नगरसेवक रविंद्र खरात यांचा जागीच खातमा केला जातो. त्याच्या भावाला मारले जाते. रविंद्र खरात यांच्या दोन्ही मुलांनाही ठार केले जाते. रविंद्र खरात यांची पत्नी रजनीमध्ये पडते तेव्हा तिच्यावर चाकूचे वार करुन जखमी केले जाते. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील चार आणि आणखी एकाला ठार केले जाते. ही घटना रात्री 9 च्या सुमाराची होय. म्हणजे अख्खे शहर तथा रविंद्र खराताच्या आजूबाजूचे लोक अद्याप जागे असताना ही घटना घडते हे विशेष होय. नवरात्रीचे दिवसात दांडियाच्या सर्वत्र गोंगाट होता. त्याचा फायदा या हत्याकांडातील गुन्हेगारांनी घेतला. त्यांनी पूर्वनियोजितपणे हे हत्याकांड केले आहे. हत्याकांडानंतर त्यातील तिघे आरोपी स्वत:हून पोलिसांत दाखल झाले हे विशेष होय. या हत्याकांडातील झटापटीत हे तिघे आरोपीसुद्धा जखमी झाले होते.
या सामुहिक हत्याकांडाने भुसावळ शहरच नव्हे तर संपुर्ण जिल्हा हादरला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची अशाप्रकारे क्रूरपणे हत्या होते यामागचे कारण काय? पोलिसांनी याचा योग्य तपास करुन यामागचे खरे कारण काय? हे शोधून काढले पाहिजे. यापूर्वी झालेल्या एका खुनात खरातांच्या मुलांचा संबंध जोडला जातो. त्यावेळी पोलिसांसमोर खून का बदला खूनसे लेंगे असे बोलले गेल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार जर सत्य असेल तर पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघितले नाही. पोलिसांनी या बाबीचा सखोल अभ्यास करुन संबंधितांवर पाळत ठेवली असती तर हे सामुहिक हत्याकांड टळले असते. भाजप या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या कुटुंबियांची अशा प्रकारे निघृणपणे हत्या होणे म्हणजे सत्ताधारी भाजप पक्षाची प्रतिमा मलीन होणार आहे. हत्याकांडात ठार झालेला भाजपचा नगरसेवक हासुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का? हत्याकांडात मरण पावलेला नगरसेवक खरात याचीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी होती असे म्हणतात. परंतु नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्याची सभापतीपदी निवड झाल्यानंतर बाकी सर्व भानगडीतून त्यांनी आपले अंग काढून घेतले होते, असे म्हणतात. तथापि त्यांचे दोन्ही मुलं मात्र तापट स्वभावाची असल्याने सातत्याने छुटपूट घटना घडत होत्या.
या सामुहिक हत्याकांडातील तीन आरोपींना अटक करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांमार्फत त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. या हत्याकांडामागचे नेमके कारण काय? त्यात कुणाकुणाचा हात आहे का? असेल तर त्याचे कारण काय? याची सखोली चौकशी होणे गरजेचे आहे. कारण नगरसेवक रविंद्र खरात हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक असल्याने त्याला वेगळी पार्श्वभूमी आहे. पोलिसांकडून याचा योग्य दिशेने तपास होणार नसेल तर त्याचा तपास सीआयडीकडे सोपविला पाहिजे. तशा प्रकारची मागणी काहींनी केलेलीच आहे. भुसावळात या हत्याकांडासंदर्भात लोकांच्या तीव्र भावना आहेत. यातील आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी अशा प्रकारची मागणी होत आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही अथवा अशी गुंडगिरी पुन्हा डोके वर काढणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेण्याची गरज आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात हे हत्याकांड घडल्यामुळे त्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुसावळ शहरातील तसेच परिसरातील शांततेचा भंग होणार नाही याचीही काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.