“मी इंदिरा गांधींची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा “

0

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत होत्या. यानंतर काही भाजपा नेत्यांकडून गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी, मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा अशा शब्दांत सुनावलं आहे. माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला खडसावले आहे.


जनतेची सेवक या नात्याने माझी लोकांशी बांधिलकी आहे. मी सरकारची स्तुती करायला बसलेले नाही. सरकारच्या विविध विभागातून मला धमकी मिळत आहे, पण यामध्ये सरकारने वेळ वाया घालवू नये. मी सत्य बोलतच राहीन. मी इतर विरोधी पक्षांप्रमाणे भाजपाची अघोषित प्रवक्ता नाहीये, अशा शब्दांत ट्विटरवरुन प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घरी आणण्यासाठी प्रियांका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल असेही गांधी यांनी म्हटले होते. मात्र या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियांका गांधी यांच्यात बराचकाळ संघर्ष चालला होता. त्यामुळे प्रियांका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजपा नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.