मिडीया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) तर्फे ऑनलाईन व्याख्यान संपन्न

0

जळगाव (प्रतिनिधी)

” मागील पंधरा वर्षात माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे .कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही” असे मत एबीपी माझाच्या प्रख्यात वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांनी व्यक्त केले.  मिडीया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या महाराष्ट्रातील माध्यम शिक्षकांच्या संघटनेतर्फे आज  आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात “माध्यमे आणि महिला” या विषयावर ज्ञानदा कदम बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की,  विविध चॅनलमध्ये महिला पत्रकारांची संख्या वाढली , मात्र अजूनही ड्युटीच्या वेळा लक्षात घेता या क्षेत्रात महिलांना येणे अवघड वाटते . या क्षेत्रात कधी कधी 24 -24 तास फिल्डवर राहावे लागते. मुले झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात, अशावेळी घरच्यांनी जर समजून घेतले नाही तर त्या महिला पत्रकाराचे करियर तिथेच संपते अशी अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत.

एखाद्या पुरुष अँकरचे केस जेव्हा पांढरे होतात, त्यावेळी कोणी चर्चा करत नाही.  मात्र एखाद्या स्त्री अँकरचे  केस काळेच असायला हवेत, तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत, अशा प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात, हे मात्र खटकते असेही ज्ञानदा कदम यांनी सांगितले. अलीकडच्या काळात पत्रकारितेत फार मोठे बदल झाले आहेत. विशेषतः प्रिंट मीडियासमोर डिजिटल मीडियाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा या काळामध्ये समाज माध्यमातून येणाऱ्या माहितीची शहानिशा करून कमी वेळामध्ये ती लोकांसमोर सादर करणे हे कौशल्य आपणाजवळ असायला हवे, असे सांगून ज्ञानदा कदम म्हणाल्या की, मी प्रारंभी माध्यमाच्या क्षेत्रात आले तेव्हा रेडिओवर माझा आवाज बारीक आहे म्हणून मला डावलण्यात आले. तेव्हाच मी ठरवले की मी एवढी मेहनत घेऊन माझा असा आवाज निर्माण करील तो संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला केला पाहिजे . त्यादृष्टीने मी कधी-कधी पुरुष सहकाऱ्यांपेक्षा अधिक अठरा-अठरा तास काम केले,  त्यामुळे त्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे असे मला वाटते.

प्रत्येक कार्यक्रम करताना खूप तयारी, संशोधन करावे लागते.  याचे उदाहरण देताना ज्ञानदा कदम म्हणाल्या “माझा कट्टा” साठी एखादा कार्यक्रम  करायचा असतो त्या वेळेला ज्या व्यक्तीविषयी तो कार्यक्रम आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन, त्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनपट अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये प्रभावीपणे लोकांसमोर सादर करायचा असतो. हे करण्यासाठी खूप अनुभव आणि संशोधन याची जोड द्यावी लागते. एखाद्या बातमीपत्राचे सादरीकरण कसे करतात केले जाते हे सांगताना त्या म्हणाल्या की, एखादे बातमीपत्र हे एखाद्या संतुलित आहारा सारखे असते .त्यात विविध प्रकारच्या बातम्या योग्य प्रमाणात घेऊन बुलेटीन सादर करावे लागते.

महिलांनी खूप मेहनत करून आणि चांगल्या प्रयत्नाने यश मिळवले तरी अनेकदा त्याविषयी शंका व्यक्त केल्या जातात .चांगले यश मिळवणाऱ्या महिलांना ट्रोल केले जाते. अशा वेळी महिलांना, त्या महिलांच्या घरच्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागतो, असे स्पष्ट करून ज्ञानदा कदम म्हणाल्या की, अशा वेळी खचून न जाता ट्रोलिंगला चांगले उत्तर द्यायला हवे .जर महिलांनी पुरुषांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा अधिक काम केले तर महिलांची कोणतीही संधी डावलली जाईल  असे मला वाटत नाही.

अँकरिंगच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, या क्षेत्रात येण्यासाठी सर्वप्रथम पत्रकारिता  अभ्यासक्रम पूर्ण करा. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या घडत असलेल्या घटना, घडामोडींकडे सजगपणे पहा, आपणाला केवळ सॉफ्ट बातम्या करायचा आहेत असे मनाशी न ठरवता प्रत्येक क्षेत्रातील बातम्या धडाडीने मांडण्याचे कार्य करा. आम्हा महिला अँकरना पूर्वी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम दिले जात नव्हते, आम्ही भांडून ती जबाबदारी घेतली. सध्या आजूबाजूला स्पर्धा खूप आहे त्यामुळे आपणाला जी संधी मिळते त्या संधीचे सोने करा म्हणजे तुमचे करियर निश्चितपणे चांगले घडू शकेल.

या कार्यक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या मीनल पाटील(जळगाव) आणि रसिका शिंदे (सोलापूर) या दोन विद्यार्थिनींना ज्ञानदा कदम यांच्यातर्फे पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी “मीम” संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माध्यम शिक्षकाची ही संघटना या क्षेत्रातील अध्यापक  आणि विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यापुढेही नियमितपणे अशी व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी ज्ञानदा कदम यांचा परिचय करून दिला. संघटनेचे सचिव डॉ .विनोद निताळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.  या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या ऑनलाइन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठ व महविद्यालयातील माध्यम शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.