महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मागील महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लादले गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? या परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले.

राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले.

‘लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक करोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला,’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ‘छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी,’ अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे.

वीजबील कशी भरायची?
‘लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची?’, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं
‘अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत. कंत्राटी कामगारांना सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं,’ अशा सूचना यावेळी राज ठाकरे यांनी केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.