मरकज कार्यक्रमात लावली हजेरी ; फैजपूरातील इसम कोरोनाचा संशयित म्हणून रूग्णालयात दाखल

0

फैजपूर । दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथील मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावलेला फैजपूर येथील एक इसम आज कोरोनाचा संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लॉकडाऊनच्या परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करत दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि किर्गिस्तान आदी देशांतील शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोनाच्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे आता स्पष्ट झाले असून येथे हजेरी लावलेल्यांचा शोध घेतला जात आहे. याआधी निजामुद्दीनच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील तेरा जणांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली होती. तथापि, निव्वळ मोबाईल लोकेशनवरून घेण्यात आलेली ही माहिती अपूर्ण असल्याने या कार्यक्रमाला कुणी हजेरी लावली हे सिध्द करणे शक्य नव्हते.

दरम्यान, निजामुद्दीन येथील कार्यक्रमात फैजपूर येथील ६३ वर्षाच्या व्यक्तीने देखील हजेरी लावली होती. यानंतर हा व्यक्ती २२ मार्च रोजी फैजपूर येथे आला होता. गत दहा दिवसांपासून त्याने याबाबतची माहिती कुणाला सांगितली नव्हती. तथापि, आता तबलिग कार्यक्रमातील संसर्गाबाबत बोभाटा झाल्यानंतर हा व्यक्ती आज सायंकाळी कोरोनाचा संशयित रूग्ण म्हणून जिल्हा रूग्णालयात रात्री दाखल झाला आहे. येथे त्याची चाचणी करण्यात येणार असून याच्या निष्कर्षानुसार उपचार करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.