ममुराबाद पुलानंतरच शिवाजी नगरचा पुल तोडा!

0

मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांचे रेल्वे प्रशासनाला पत्र

जळगाव दि. 1-
ममुराबाद पुलाचे काम झाल्याशिवाय शिवाजी नगरचा पुल तोडू नये, अशा आशयाचे पत्र महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे रेल्वे प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले.
प्रसारमाध्यमांत 5 फेबु्रवारी रोजी शिवाजी नगर पूल तोडणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. मात्र पुल तोडल्यानंतर शिवाजीनगर वासियांना दळणवळणासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नाही. जो रस्ता एसएमआयटी कॉलेजकडून आहे तो एक किलोमीटरचा फेरा नागरिकांना पडणार आहे. दुसरा पर्यायी रस्ता ममुराबाद रस्त्यावरील लेंडीनाल्यावरील पुलाचा आहे. मात्र त्याचेही काम सुरु आहे. येत्या काही दिवसांत शिवाजी नगर पुल तोडला तर दररोज 5 ते 10 हजार टूव्हीलर व 50 हजार नागरिकांचा वापर असलेल्या शिवाजी नगर वासियांना पर्यायी रस्ताच उपलब्ध राहणार नसल्याने तसेच एसएमआयटीकडील रस्ता दीड किलोमीटरचा फेरा पडणार असल्याने लेंडी नाल्यावरील ममुराबाद पुलाचे काम व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याचप्रमाणे गेल्या महासभेत नगरसेविका प्रिया जोहरे यांनी लेंडी नाल्याच्या पुलाचे कामकाज पुर्ण करावे, तो रस्ता वापरण्याजोगा झाल्यानंतरच शिवाजी नगर पुलाचा विचार करावा, असा ठराव केला होता. त्याप्रमाणे मनपा आयुक्त डांगे रेल्वे प्रशासनास पत्र देवून शिवाजी नगर पुल तोडण्याची कारवाई स्थगित करण्याची विनंती करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.