भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळेंविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

0

भुसावळ  (प्रतिनिधी)- शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासह रस्त्यांची कामे करण्यात भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे हे अपयशी ठरल्याने त्यांना अपात्र करण्यासाठी शहरातील नागरीकांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमृत योजनेच्या पाईपलाईनमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था विदारक झाली असून तीन वर्षानंतरही योजनेचे काम पूर्ण झालेले नाही तसेच रस्त्यांची कामे न झाल्याने नागरीकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

यांनी दाखल केली याचिका
मोहम्मद अयुब मो.मसुद (46, जुना बाजार, जाम मोहल्ला), फारूक अब्दुल मनी देशमुख (46, खडका रोड, सिद्धेश्वर नगर, भुसावळ), सैय्यद आरीफ अली कुर्बान अली (देशमुख अपार्टमेंट, मण्यार हॉलजवळ, खडका रोड, भुसावळ), नजीर खान अमजद खान (75, मटण मार्केट रोड, नसरवांजी फाईल, भुसावळ), मोहम्मद आसीफ हाशम शेख (50, सुखवस्तू, खडका रोड, नुरानी मशिदीजवळ, भुसावळ) यांनी 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे नगराध्यक्ष रमण भोळे यांना अपात्र करण्याची याचिका दाखल केली असून जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षांना कर्तव्याचा विसर
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे यांना कर्तव्याचा विसर पडला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून नागरीकांना पायी चालणेही कठीण झाले आहे शिवाय शहरातील सर्वच भागात अस्वच्छता पसरल्याने डेंग्यूचा विळखा वाढला असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातच नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अशुद्ध असल्यानेही आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात अनेक इमारती पडक्या असतानाही ते पाडण्यात आल्या नसल्याने जीवीतहानी होण्याची शक्यता आहे शिवाय पालिकेची इमारत जीर्ण झाल्यानंतरही दखल घेण्यात आलेली नाही तसेच पालिकेतील रस्त्यांसाठीचा आलेला निधी खर्च न झाल्याने शासनाकडे परत गेल्याने यातून नगराध्यांची अकार्यक्षमता सिद्ध झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.

जवाबदार धरणे योग्य नाही,जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल  -नगराध्यक्ष रमण भोळे
अमृत योजनेमुळे शहरात रस्त्यांची कामे होणार नाही हे स्पष्ट आहे व रस्त्यांसाठी नगराध्यक्षांना जवाबदार धरणे योग्य नाही, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल असल्याने ते निश्चित योग्य तो निर्णय घेतील.

Leave A Reply

Your email address will not be published.