भाजप आमदाराची अमिताभ बच्चन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

0

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चन आणि सोनी वाहिनीवर केला आहे.

सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ यामध्ये ३० ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी सहभागी झाले होते. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून वाद उभा राहिला आहे. २५  डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कोणता धर्म ग्रंथ जाळला होता? असा तो प्रश्न होता आणि त्याला पर्याय हे विष्णुपुराण, भगवत गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती असे होते.

या प्रश्नाला विरोध करताना अभिमन्यू पवार यांनी म्हंटले कि, भारतात अनेक धर्म आहेत. त्यामुळे पर्यायांमध्ये चारही धर्म आले पाहिजे होते. परंतु विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. अन्य धर्मांग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दोन समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने केबीसीचा हा प्रश्न विचारण्यात आला आहे, असा दावाही पवार यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.