भडगाव तालुक्यातील वादळी अनुदानावरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

0

मा. आ. दिलीप वाघांना विधानसभेत प्रश्न मांडण्याची सवय नसल्याने त्यांची किव येते – आमदार किशोर पाटील

पाचोरा :- मी आमदार झाल्यापासुन पाच वर्षात विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न मांडुन ते मार्गी लावले. विधानसभेत कोणता प्रश्न केव्हा मांडावा ? व त्याला किती वेळ मिळतो याची माजी आमदार दिलीप वाघ यांना जाण नसुन ते पाच वर्षे विधानसभेत सदस्य असतांना एकही प्रश्न मांडु शकले नाही. या गोष्टीची मला खरोखर किव करावीशी वाटते. वाघ यांनी मी पाच वर्षात मांडलेल्या प्रश्र्नांच्या क्लिप्स बघाव्यात आणि त्यातुन शिकुन घ्यावे असे थेट आवाहन किशोर पाटील यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांनी दि. २१ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देतांना पत्रकार परिषदेद्वारे दिले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, दिपक राजपुत, अॅड. दिनकर देवरे, माजी महानगर प्रमुख गजानन महालपुरे, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, भरत खंडेलवाल, नगरसेवक वाल्मिक पाटील, बापु हटकर, आनंद पगारे उपस्थित होते.

भडगांव तालुक्यातील काही गावांमध्ये दि. ११ रोजी वादळी पाऊस व गारपिट झाली होती. यात शेतकऱ्यांची केळी व नव्याने लावलेल्या कापुस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. २० रोजी विधानसभेत प्रश्न मांडुन मुख्यमंत्र्यांचे लक्ष केंद्रीत केले होते. मात्र आमदार किशोर पाटील यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसल्याने अवकाळी झालेल्या पावसामुळे विशेष बाब म्हणून अनुदान मिळण्यासाठी प्रश्न विचारायला हवा होता. अशी माहिती दिलीप वाघ यांनी दि. २१ रोजी पत्रकार परिषदे द्वारे दिली होती. यावर उत्तर देण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. २२ रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलीप वाघ यांना टोला लगावत वाघ यांनी त्यांच्या काळात विधानसभेत शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही प्रश्न विचारलेला नसल्याने कोणता प्रश्न कधी विचारावा ? याची त्यांना जाण नसल्याचे सांगुन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदानावरुन आजी – माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पत्रकार परिषदेत बोलतांना आ. पाटील यांनी सांगितले की, विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या विषयावर चर्चा होत असते. मी दि. २१ रोजी मांडलेल्या प्रश्र्नांद्वारे गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर भागात केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना तात्कालिन भाजपाच्या मुख्यमंत्री यांनी हेक्टरी १ लाख रुपये अनुदान दिले होते. त्याच धर्तीवर भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. कदाचित ती क्लिप वाघ यांनी बघितली नसावी. वाघ हे आमदार असतांना व मी विरोधात असतांना दर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान एकतरी आंदोलन करीत होतो. मात्र मी मतदारांच्या विश्वासाने पाच वर्षात विधानसभेत इतके प्रश्न विचारले व विकास कामे ही केली. त्यामुळे दिलीप वाघ यांना आंदोलन करण्याची आवश्यकता ही भासु दिली नाही. यामुळे दिलीप वाघ यांनी माझ्या बाबतची चिंता सोडुन द्यावी असे आवाहन ही माजी आमदार दिलीप वाघ यांना यावेळी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.