बोदवड येथे भरदिवसा चोरट्यांनी दोन घराचे कुलूप तोडून अडीच लाख रुपये केले लंपास

बोदवड (प्रतिनीधी) : शहरातील विद्यानगर व मुक्ताई मंगल कार्यालय परिसरातील अशा दोन घरांचे भरदिवसा कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि.१० सोमवार रोजी सकाळी ११ ते २ च्या सुमारास घडली असून भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात शहरातील विद्यानगरातील रहिवाशी तथा तालुक्यातील शेलवड गावचे पोलीस पाटील प्रदिप सुकाळे यांच्या घरी चोरी ही चोरीची घटना घडली असून त्यांच्या घरातील कपाटातील २ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास करीत पोबारा केला.सुदैवाने घरात दुस-या ठिकाणी ठेवलेले दागिने वाचले.सुकाळे यांचे आई – वडिल गेल्या दोन महिन्यापासून पुण्याला त्यांच्या बहिणीकडे गेले आहेत.तर त्यांचा मुलगा व पत्नी रक्षाबंधननिमित्त माहेरी नाशिक येथे गेलेल्या आहेत.ज्या दिवस चोरीची घटना घडली त्या दिवशी सुकाळे हे तालुक्यातील जलचक्र येथे नातेईकांच्या अंत्यविधीसाठी घराला कुलूप लावून गेले होते.चोरट्यांनी याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून २ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

दुस-या घटनेत शहरातील मुक्ताई मंगल कार्यालय परिसरातील रहिवाशी निवृत्त स्टेशन मास्तर दिवानसिंग नवलसिंग पाटील व त्यांच्या पत्नी देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते.त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील १० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

या प्रकरणी प्रदिप सुकाळे व दिवानसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरिक्षक भाईदास मालचे करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना घडत असून एकप्रकारे चोरट्यांनी पोलीस प्रशासनासमोर आवाहन उभे केले आहे.वाढत्या चोरीच्या घटना पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोरट्यांना जेरबंद करून कायमची अद्दल घडविणे गरजेचे आहे.

Comments are closed.