फैजपूर येथील सोसायटी वाईनवर किमतीपेक्षा जास्त भावाने मद्यविक्री

0

फैजपूर (प्रतिनिधी): फैजपूर भुसावळ रस्त्यावर असलेल्या सोसायटी वाईन या वाईन शॉप वर शासनाच्या नियमानुसार ठरवून दिलेल्या एमआरपी पेक्षा अधिक भावाने राजरोसपणे मद्यविक्री केली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभाग यावल व भुसावळ यांच्या आशिर्वादाने हा गोरखधंदा सुरू आहे का?? याची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथील प्रसिद्ध मद्य व्यवसायिक जयकीशन टेकवाणी यांच्या पत्नी च्या मालकीचे फैजपूर भुसावळ रस्त्यावर फैजपूर येथे सोसायटी वाईन नावाने मद्यविक्री चे दुकान आहे.गेल्या तीन चार वर्षांपासून सदर दुकानातून शासनाने ठरवून दिलेल्या एमआरपी पेक्षा जास्त भावाने मद्यविक्री केली जात असून ग्राहकाने पक्के बिल मागितले असता दारुचे पक्के बिल आम्ही देत नाही असे सांगून किंमतीपेक्षा वीस ते पन्नास रुपये जास्त घेतले जातात.अशाप्रकारे महिन्याला लाखो रुपये ग्राहकांकडून लुटले जात असून शासनाचा महसूल देखील बुडत आहे. सदर प्रकाराची उत्पादन शुल्क विभाग देखील चौकशी करून कारवाई करत नसल्याने जयकीशन टेकवाणी यांच्या सोसायटी वाईन ला उत्पादन शुल्क विभाग व प्रशासनाचे आशिर्वाद आहेत की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.टेकवाणी यांचे फैजपूर प्रमाणेच सावदा व इतर ठिकाणी देखील मद्यविक्री चे दुकाने असून सर्व ठिकाणी मिळून निश्चितच लाखो रुपये ग्राहकांकडून अतिरिक्त लुटले जात आहेत.या लुटीमधे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरू असून यामुळे उत्पादन शुल्क विभागाची देखील बदनामी होत आहे त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी व सामान्य ग्राहकांची बेकायदा होत असलेली लूट थांबवावी अशी मागणी केली जात आहे.

 

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यावल येथील अधिकारी के एन बुवा व भुसावळ विभागाचे अधिकारी वाघ साहेब यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला असता दोघे अधिकारी रजेवर असल्याने याविषयी काही सांगू शकत नाही असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते.मग याविषयी तक्रार करावी तर कोणाकडे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

 

सदर सोसायटी वाईन चे संचालक जयकीशन टेकवाणी यांच्याशी संपर्क साधला असता मी मिटिंगमध्ये आहे नंतर बोलतो असे सांगत फोन कट केला.यानंतर संचालक टेकवाणी यांना प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला दुकानातील कर्मचार्यांना पगार द्यावा लागतो दुकानाचे लाईटबील भरावे लागते व त्याचबरोबर इतर अनेक खर्च आहेत त्यामुळे एमआरपी नुसार मद्य‌‌‌ विक्री करायला परवडत नाही असे टेकवाणी म्हणाले.यामुळे टेकवाणी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मिळून नियमबाह्य पद्धतीने ग्राहकांकडून महिन्याकाठी लाखो रुपये जास्तीचे घेऊन लूटमार केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

 

फैजपूर परीसरातील अवैध दारुचे सोसायटी वाईन बनलेय मुख्यालय?

फैजपूर आणि पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये अवैधरित्या विक्री होत असलेली अवैध दारु ही फैजपूर भुसावळ रोडस्थीत जयकिशन टेकवाणी यांच्या मालकीच्या सोसायटी वाईन मधूनच सप्लाय केली जात असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होत असून या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग हेतुपूरस्कर दुर्लक्ष करुन सदर सोसायटी वाईन ला एकप्रकारे पाठिंबा देत आहे का? असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होत आहे.

 

ड्राय डे च्या दिवशी दुप्पट दराने विक्री

शासकीय आदेशाने ड्राय डे च्या दिवशी सर्व मद्यविक्री ची दुकाने बंद ठेवली जातात.परंतु मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात आले की सदर सोसायटी वाईन मधून ड्राय डे च्या दिवशी मागच्या दाराने व किमतीपेक्षा दुप्पट दराने अवैधरित्या मद्य विक्री होत असते.मग हे सर्व कोणाच्या पाठबळ व आशिर्वादाने चालू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सोसायटी वाईन शॉप फैजपूर विरोधात अधीक्षकांकडे तक्रार दाखल

फैजपूर येथील सोसायटी वाईन शॉप मधून किमतीपेक्षा जास्त भावाने मद्यविक्री केली जात असल्याची चर्चा लक्षात घेता फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी सोमवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव जिल्हा अधीक्षक मॅडम यांची भेट घेऊन सोसायटी वाईन शॉप विरुद्ध लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिक्षक मॅडम यांनी दिले आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनादेखील यासंदर्भात लेखी तक्रार अर्ज देऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.सदर तक्रार अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई,प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र व नाशिक विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनादेखील प्रत रवाना करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.