पोकळ धमक्या आणि शिवसेना!

0

तुझे माझे जमेना तुझ्या वाजून करमेना अशी भाजप-शिवसेनेची गत झाली आहे. शिवसेना प्रत्येकवेळी भाजपला धमकीत घेत नानाविध इशारे देत असले तरी शिवसेनेच्या या धमक्या भाजपने कधीच मनाला लावून घेतलेल्या नाही. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र्य लढणार्‍या
शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठींबा देत पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन
सत्तेत सहभाग घेतला. गेल्या चार वर्षात तर सेनेच्या अनेक नेत्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या मात्र त्या पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. गुरुवारी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या अर्विभावात पत्रपरिषद घेवून दम भरण्याचा प्रयत्न केला तो पूर्णत: फेल गेला आहे. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी सेनेला चार वषार्ंपासून मुहूर्ताची वाट पहावी लागत आहे हे केवळ राजकारण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्तेत शिवसेना असली तरी शिवसेनेला सरकारमध्ये मानसन्मान आणि
महत्त्वाची पदे मिळत नाहीत. या पक्षाचा हा चार वर्षांचा अनुभव असताना देखील सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय रास्तवेळी घेण्यात येईल, अशी भूमिका सातत्याने मांडत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या

                                             ——मन की बात——-
विरोधात आवाज उठविण्याचे काम सातत्याने सेनेने अलीकडच्या काळात नियमितपणे केले. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सतत वादात राहिल्यामुळे विरोधकांची जागा मिळवत, मुंबईसह कोकणात राजकीय वरचष्मा कायम ठेवण्याचा शिवसेनेचा इरादा पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. सुरुवातीपासून मोदी व शहा यांच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणार्‍या सेनेने एकला चलो या भूमिकेवर भक्कम वाटचाल करण्याचे या निवडणुकांद्वारे दाखवून दिले.
पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने प्रथमच लढविला आहे. या मतदारसंघात सन 2014च्या निवडणुकीत चिंतामण वनगा हे भाजपच्या तिकिटावर मोदीलाटेत लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. वनगा हे हाडाचे कार्यकर्ते होते. शिवाय संघ परिवारातील संघटना या भागात कायम टिकून राहतील यासाठी त्यांनी सारी हयात वेचली. वनगा यांचा भाजपच्या मोठ्या प्रकल्पांना तीव्र विरोध होता. त्यामुळे केंद्र व राज्यात सत्ता असतानाच भाजपने वनगा यांना ते हयात असताना फार महत्त्व दिले नव्हते. पालघर विधानसभेतील शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत
शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित घोडा यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले. अमित घोडा यांनी तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांचा दारुण पराभव केला होता. पण, त्यावेळी सेनेचे एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता. या पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबातील नाराजी लक्षात घेऊन दिवंगत चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना शिवसेनेत आणण्यात यश मिळाले. भावनिक आधारावर ही निवडणूक जिंकण्यासाठी सेनेने कोकण व शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांचा फौजफाटा पालघरमध्ये उतरविला होता. त्यामुळे भाजपला घाम फोडण्याचे काम शिवसेनेने येथे केल्याचे मतदानावरून दिसते. श्रीनिवास वनगा हे दुसर्‍या क्रमांकावर असून, त्यांनी 2 लाख 43 हजार 210 मते घेतली आहेत. यामुळे भविष्यात शिवसेना येथे आणखी पाय रोवू शकते हे यातून स्पष्ट झाले.
शिवसेना एकला चलो ही भुमिका घेत आहे हे मराठी माणसांसाठी चांगले नाही व हिंदू साठी ही. उद्या ते काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून घेतील तेव्हा काय हालत होईल हे कळेलच. मात्र सेनेनी जी डरकाळी फोडली ती केवळ दिखावू असून त्याचा भाजपने काहीही धसका घेतलेला नाही. भाजपने पालघरमध्ये मिळविलेला विजय मोठा असला तरी दल बदलूंपासून भाजपला देखील दोन हात लांब थांबावे लागणार आहे.

दीपक कुलकर्णी
8380090700

Leave A Reply

Your email address will not be published.