पुढील आठवड्यात होऊ शकते अनलाॅक २.० ची घोषणा; ‘या’ गोष्टी होतील सुरु

0

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे 25 मार्च ते 31 मे दरम्यान देशात लॉकडाउन लादण्यात आला. त्यानंतर 30 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्यासाठी अनलॉक -1.0 चा 1 जूनपासून प्रारंभ झाला. आता सरकारने अनलॉक-2.0 ची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 30 जून रोजी अनलॉक-2.0 वर काही गाइडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी न्यूजला सांगितले की, या वेळी इंटरनॅशनल फ्लाइट्स, शाळा आणि मेट्रो सुरू करण्यावर सरकारचे लक्ष असेल.

अनलॉक-2.0 च्या प्रक्रियेशी संबंधित एका सरकारी अधिका-याने या बातमीला दुजोरा दिला आहे की, अनलॉक-2.0 च्या संदर्भात लवकरच काही गाइडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. तसेच काही आंतरराष्ट्रीय मार्ग हे खासगी वाहकांकरिता उघडले जाऊ शकतात मात्र मेट्रो सेवा रीस्टार्ट करण्यास वेळ लागू शकेल.

सर्व मोठ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार सध्या मेट्रो गाड्यांचे कामकाज सुरू करण्यास कचरत आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. मुंबईत थोडी सुधारणा झाली आहे, मात्र आता उपनगरामध्ये संक्रमण वेगाने वाढत आहे. दक्षिणेस चेन्नईने कोरोनाचा आलेख नियंत्रित करण्यासाठी पुन्हा लॉकडाउन लादला आहे तर बंगळुरुमध्ये वाढत्या घटनांमुळे आंशिक लॉकडाउन लादण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मेट्रोचे कामकाज पुन्हा सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकेल.

शैक्षणिक संस्था
कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता सरकार शैक्षणिक संस्थाही उघडण्यास टाळाटाळ करीत आहे. कर्नाटक वगळता बर्‍याच राज्यांनी त्यांच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करून निकाल जाहीर करण्यासाठी सीबीएसई आणि आयसीएसई यांनी पर्यायी ग्रेडिंग योजना तयार केली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अनलॉक-1 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा-महाविद्यालयांचा निर्णय ज्या त्या राज्यांशी सल्लामसलत करूनच घेण्यात येणार होता. राज्यांच्या सल्ल्यानुसार शाळा / महाविद्यालये सुरू केली जाणार होती. राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश प्रशासन संस्थात्मक पातळीवर पालक आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करू शकतात. आणि त्यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारेच जुलैमध्ये पुन्हा शैक्षणिक संस्था उघडण्याचा निर्णय घेता येईल. असे 30 मे च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले.

हवाई प्रवास
खासगी वाहकांना काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर ऑपरेट करण्याची परवानगी देण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. वास्तविक, अमेरिकेच्या प्रशासनाने भारताच्या वंदे भारत मिशनवर आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात की, या योजनेंतर्गत एअर इंडिया अमेरिकेत उड्डाणे करत आहे मात्र अमेरिकन वाहकांना अमेरिका-भारताच्या मार्गावर उड्डाण करण्याची परवानगी नाही आहे. अमेरिकेने वंदे भारत मिशनला परवानगी न देण्याची धमकी दिली आहे. युएईनेही वंदे भारत मिशनवर आक्षेप घेतले आहेत. त्याचबरोबर केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनीही केंद्र सरकारला दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये उड्डाण करण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.