पाचोरा येथील गणपती विसर्जनात क्रेन व अन्य सुरक्षा व्यवस्था सज्ज

0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस ठाणे व रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पाचोरा नगरपालिकेच्या सहकार्याने गणेश भक्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी यंदा प्रथमच क्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान-मोठे गणेश मंडळे आणि घरगुती लहान गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र गणपती विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

पाचोरा येथील सर्वच गणेश मंडळ व घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन बहुळा धरणात अर्थातच कृष्णा सागरच्या बॅक वॉटर वरून जाणाऱ्या पाचोरा जळगाव रोड वरील पुलावर केले जाते. मागील वर्षापेक्षा यावर्षी पुलाखाली प्रचंड जलसाठा असल्याने पाचोरा पोलिसांतर्फे रोटरी क्‍लबच्या सहकार्याने एक मोठी क्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुळा नदीच्या पुलावर उभ्या असलेल्या क्रेनच्या सहाय्याने सर्व गणेश मूर्तींचे धरणाच्या खोल पाण्यात विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. यामुळे मूर्त्यांची कुठल्याही प्रकारची विटंबना न होता धार्मिक भावना जोपासून व पूर्णपणे सुरक्षा व सावधानतेने निर्विघ्न गणेश विसर्जन करण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.

याशिवाय शहरातील सर्व लहान-सहान गणेश मंडळे व घरगुती गणपती बाप्पा च्या मुर्त्या हिवरा नदी पुलावर शिस्तीने संकलित करून गणेश भक्तांनी भक्ती भावपूर्ण आरती करावी. लहान मूर्त्यांसाठी स्वतंत्र संकलन काउंटर याठिकाणी असणार आहे. तेथेच लहान मुर्त्यांची आरती करावी व उपलब्ध करून दिलेल्या टाक्यांमध्ये स्वहस्ते विसर्जन करावे. प्रशासनातर्फे  सर्व संकलित मुर्त्यांचे पूर्ण श्रद्धेने व शिस्तीत धरणाच्या पाण्यात विसर्जन करण्यात येईल. पोलिसांची नजर चुकवून नियोजित विसर्जन ठिकाण वगळता इतरत्र कोठेही विसर्जन करण्याचा प्रयत्न करू नये, व आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे  व रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भूषण मगर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.