धडाका कायम राखण्यास टीम इंडिया उत्सुक

0

वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग: वन-डे क्रिकेट मालिका ५-१ अशी धडाक्यात जिंकणारा भारतीय संघ आता टी-२० मालिकेतही आपला धडाका कायम राखण्यास उत्सुक आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यू वॉँडरर्स स्टेडियममध्ये रविवारी रंगणार आहे.

सहा सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-१ ने असे हरविले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच वन-डे मालिकेतील पाच सामने भारताने प्रथमच जिंकले. साहजिकच भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. डिसेंबर २००६मध्ये या स्टेडियममध्ये झालेल्या टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेटनी मात केली होती. तशीच कामगिरी करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया रविवारी मैदानात उतरेल. कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने वन-डे मालिकेत साडेपाचशेहून अधिक धावा केल्या. आता टी-२० मालिकेतही आपला धडाका कायम राखण्यास कोहली उत्सुक आहे. त्यासोबत रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्या आणि पुनरागमन करणारा सुरेश रैना यांच्यामुळे भारतीय फलंदाजी अधिक भक्कम आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, फिरकीपटू चहल आणि कुलदीप यादव यांच्यावर भिस्त असेल.

दुसरीकडे, ड्युमिनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेची भिस्त ड्युमिनीसह डिव्हिलियर्स, डेव्हिड मिलर, मॉरिस यांच्यावर असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.