दूध उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही ; देवेंद्र फडणवीस

0

मुंबई । ”राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही,” असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्यक्त केला.


दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेते आणि मित्र पक्षातील नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमचे इतर सहकारी महादेवराव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानीताई फरांदे आणि इतरही नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दूध आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत असाच प्रश्न आमच्या सरकारच्या काळात आला तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूधखरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते.दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच. या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ही लढाई संपेस्तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.