ट्रॅक्टर पलटी होऊन मजुर जागीच ठार

0

जामनेर, दि.२६, प्रतिनिधी :- शेतातील कुट्टी भरण्यासाठी देवळसगांव येथील पाट रस्त्याने जात असलेल्या ट्रक्टर शेतातील पाटा जवळ उलटला. या भिषण अपघातात ड्रायव्हर शेजारी बसलेला भिमराव शांताराम तायडे ( वय २३ ) हा ट्रक्टर खाली दाबला गेल्याने जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना काल संध्या 6 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अन्य एक मजुर सुध्दा जखमी झाला आहे. तर ड्रायव्हर मात्र बचावला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील प्रकाश शामराव इंगळे ( पाटील ) यांच्या ट्रक्टरने (क्रं MH.19 BG.5195) काल संध्याकाळी मयत मजुर भिमराव तायडे याच्यासह एक अन्य मजुर व ड्रायव्हर असे तीघे कुट्टी भरण्यासाठी पाट रस्त्याने शेताकडे जात होते. यावेळी ड्रायव्हर (नाव माहित नाही ) याचे ट्रक्टर वरील नियंत्रण सुटुन पाट रस्त्या जवळील शेतात ट्रक्टर उलटले. अचानक झालेल्या या अपघातामध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजुला बसलेले दोन मजुर बाहेर फेकला गेल्याने यात भिमराव तायडे हा ट्रक्टरच्या खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य एक मजुर जखमी झाला आहे. सुदैवाने ड्रायव्हर मात्र बचावला आहे. जामनेर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद झाल्या नंतर रात्री उशीरा जेसीबी मशीनीने ट्रक्टर बाजुला सारून भिमराव तायडे याचा मृतदेह शवविच्छेदानासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तर अन्य एका जखमी मजुरावर उपचार सुरू आहेत.

मयत मजुर भिमराव तायडे याचे मागील वर्षीच मे माहिन्यात 5 तारखेला लग्न झालेले होते. लग्नाला वर्ष होण्याच्या आधीच काळाने घाला घालुन वृद्ध आई – वडीलांचा एकमेव सहारा सुध्दा हिरावुन घेतला आहे. मयत भिमराव हा तीन बहिणींचा एकुलता भाऊ असुन वृद्ध आई – वडीलांचा सांभाळ आता कोण करणार ?हा प्रश्न या बहिणी समोर उभा राहीला आहे. भिमराव तायडे याच्या अपघाती मृत्यु मुळे देवळसगांव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.