जीवावर उठलेल्या ‘अमृत’ची समीक्षा

0

जळगाव :- शहरातील ज्या भागात अमृत योजनेचे काम करायचे राहून गेले आहे. अशा भागातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अर्ज करावा, असे आवाहन आ. राजुमामा भोळे यांनी केले.

शहरात खराब रस्त्यांमुळे अपघाताने दोन जण मृत्यूमुखी पडले आहेत त्या पार्श्वभूमीवर अमृत योजनेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मनपा प्रशासन व मक्तेदार यांच्या यांच्यात समन्वय बैठकीचे आयोंजन सोमवारी सकाळी 11 वा. महानगरपालिकेत महापौर सिमा भोळे यांच्या दालनात करण्यात आले होते.

या बैठकीला आ. राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, मजीप्रचे श्री. निकम, जे. आय. मनियार, मक्तेदार अभय जैन, डी. एच. चौधरी, श्री. ललवाणी, बर्‍हाटे नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, सुनिता नेरकर, उज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते.

बैठकीत आ. राजुमामा भोळे यांनी गैरसोयीबाबत नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त करत मक्तेदार अभय जैन यांना मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. 50 वर्षानंतर शहराला चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुख्य रस्त्यांना डब्लूबीएम करावे. निविदेत खच टाकायची नाही असे असल्याने त्याचे वेगळे कोटेशन करुन टाकावे, अशा सूचना केल्याचे आ. भोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर कामाला तांत्रीक अडचणी व आर्थिक प्रश्न येत आहेत. मात्र वर्षभरात याकामाची पावती दिसणार असल्याचे ते म्हणाले.

360 किमी चे काम झाले

शहरात अमृत योजनेंतर्गत 360 किमीचे काम झाले आहे. मात्र 18 महिन्यांनंतर काम थांबविण्याचे सांगितले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करत पाऊस पडल्यानंतर रस्ते पुन्हा उखडणार असल्याचही जैन यांनी सांगितले.

सोयीनुसार काम करा

पक्ष न पाहता नगरसेवकांच्या व नागरिकांच्या अडचणी समजून घेवून काम करा, आपल्या तांत्रीक अडचणीत नागरिकांचा काय दोष? असा सवालही आ. भोळे यांनी यावेळी विचारला. मक्तेदारालाही मुरुम, खडी, खस टाकण्याच्या सूचना देत आठ दिवसाआड किंवा पंधरा दिवसाआड बैठक आयोजित करुन नेहमी समन्वय साधून काम करा अशा सूचना आ. भोळेंनी दिल्या.

सेना पदाधिकार्‍यांची स्वत:हुन उपस्थिती

अमृतविषयी आढावा बैठकीसाठी सेना पदाधिकारी नगरसेवकांना आमंत्रित किंवा निरोप देण्यात आला नव्हता. मात्र आज अमृतविषयी आढावा बैठक होणार असल्याचे माहित असल्याने सेना नगरसेवकांनी स्वत:हुन हजेरी लावली असल्याचे एका पदाधिकार्‍याने पत्रकारांना सांगितले.

निवृत्त शिक्षकांना आठ दिवसांत पैसे द्या

अमृतच्या आढावा बैठकीनंतर मनपाच्या निवृत्त शिक्षकांनी आ. भोळे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांची भेट घेवून सात महिन्यांपासून पेन्शन नसल्याची कैफियत मांडली. यावेळी लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना बोलावून दोन ते तीन दिवस प्रक्रिया राबवून आठ दिवसांत शिक्षकांचा प्रश्न मिटवा, अशा सूचना आ. भोळेंनी केल्या.

पावसाने रस्ता दुरुस्ती निष्फळ

शहरात अनेक ठिकाणी मोठ्या खड्यांना मुरुम, खचद्वारे बुजविण्यात येत आहे. मात्र पाऊस पडल्याने माती वाहून जावून केवळ दगडगोटे शिल्लक राहत आहेत. डांबराच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डांबरच लागणार  आहे. तेथे सिमेंट टाकू शकत नाहीत. अमृत योजनेत फोडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती मक्तेदाराकडूनच अपेक्षित आहे. मात्र डांबरी रस्त्याना डांबरच लावावे लागणार आहे. तसेच मुरुम टाकल्यानंतर पावसाने माती व मुरुम खाली बसतो व त्यात पुन्हा पाणी साचते. मुरुम टाकून रोलर फिरविल्याने पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत  असल्याने रोलर फिरवू शकत नसल्याचे मक्तेदार अभय जैन यांनी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.