जिल्ह्याचे प्रमुख कारभारी राष्ट्रवादी, सेनेच्या रडारवर

0

जळगाव – कोरोनाने जिल्ह्यात शंभरी ओलांडली आहे. हे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे अपयश असुन याला जबाबदार असलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे जिल्ह्याचेे प्रमुख कारभारी आता राष्ट्रवादी, शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. या अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी अशा मागणीचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता योगेश देसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केले आहे.

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरोनाची संख्या अवघी तीन होती. मात्र या महिनाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आजमितीला जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या १२४ झाली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेला जळगाव जिल्हा केव्हाच रेड झोनमध्ये गेला. तरी देखिल प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय यंत्रणा अपयशी
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. सीमाबंदी, सोशल डिस्टंन्सींग, सुरक्षितता, गर्दी या सर्वांचा विसरच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे अमळनेर, भुसावळ, पाचोरा, चोपडा आणि जळगाव या तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दैनंदीन वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासकीय यंत्रणेला अपयश आल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ता योगेश देसले यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मालेगावच्या धर्तीवर अधिकार्‍यांची बदली करा
मालेगाव हे राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक मोठे हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे तेथील आयुक्ताची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने मालेेगावच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर, एसपी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांची तातडीने बदली करावी असे ट्वीटही योगेश देसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केले आहे.
शिवसेनेच्या मालपूरेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेले अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे हे अतिशय अकार्यक्षम अधिकारी असल्याचे शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. जिल्हयातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असुन १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य चुकांचे परिणाम जिल्हावासियांना भोगावे लागत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या महाभयंकर आजावर नियंत्रण मिळविण्यासाठी सक्षम जिल्हा वैद्यकीय अधिष्ठाताची गरज आहे. तरी आपण सक्षम अधिष्ठाता नियुक्त करावा अशी मागणी गजानन मालपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.