जिल्हा कारागृहातील बंदीवान कैद्याचा मृत्यू

0

डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप : दंगलीच्या गुन्ह्यात केली होती अटक
जळगाव, दि.1 –
रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यात 48 वर्षीय एका संशयिताला अटक करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक खालावल्याने जिल्हा रूग्णालयात औषधोपचार करून त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, रात्री झोपेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे दोन महिन्यांपूर्वी दंगल झाली होती. याप्रकरणी गावातील बहुतांशी नागरिकांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यातील काही संशयित फरार असल्याने त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरूच होती. काही दिवसांपूर्वी रविंद्र गंभीर कोळी वय-48 यांच्यासह काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
जिल्हा रूग्णालयात तपासणी
बुधवारी त्यांची न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी त्यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर काही गोळ्या देवून पुन्हा कारागृहात रवानगी केली होती.
झोपेत मृत्यू, डॉक्टरांवर आरोप
रविवारी पहाटेच्या सुमारास रविंद्र कोळी यांचा झोपेतच मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. निंभोरा पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर नातेवाईकांना सांगण्यात आले. जळगाव शहरात राहणारे नातेवाईक काही वेळातच कारागृह परिसरात हजर झाले. दरम्यान, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत रूग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.