जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून कडक निर्बंध…

0

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी संध्याकाळी काढले आदेश

जनता कर्फ्यू ला शिथिलता देत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी संध्याकाळी काढले आदेश

जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून ‘हे’ असतील कडक निर्बंध…
संपूर्ण आदेश जसाच्या तसा वाचा लोकशाहीवर

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 14 – जळगाव जिल्ह्यात covid-19 विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्ग अधिक वाढ होऊ न देता उपाय योजना राबवणे आवश्यक आहे याकरता निर्बंध लागू करणे आवश्यक आहे आणि ज्याअर्थी घोषात या कार्यालयाचे आदेश दिनांक 9 मार्च 2021 व दिनांक 11 मार्च 2021 अन्वये अनुक्रमांक जळगाव शहर मनपा हद्दीत व चोपडा, चाळीसगाव नगर पालिका हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शीथीलता देणे आवश्यक असून भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक 16 मार्च 2021 पासून पुढील आदेश होई पावतो जळगाव जिल्ह्यातील खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश आज दि.14 मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले

1)सर्व शाळा महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, शिकवणी क्लासेस कोचिंग क्लासेस 16 मार्च पासून बंद राहतील.ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व काम करावे.10 व 12 च्या बाबतीत पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील.

2) राष्ट्रीय राज्य विद्यापीठ/शासन/शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.

3) अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ 50 % क्षमतेच्या मर्यादेत कोविड -19 नियमावलीचे पालन करुन सुरु ठेवता येतील.

4) जळगांव जिल्हयातील सर्व दुकाने सकाळी 07.00 ते रात्री 07.00 या कालावधीत चालू राहतील. (हे निबंध अत्यावश्यक सेवा/मनुष्य व प्राणीमात्रासाठी जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दुध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना लागू राहणार नाही).

5) जळगांव जिहयातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

6) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल.

7) लग्न समारंभ व इतर समारंभ दिनांक 20/03/2021 पर्यंतचे पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-19 चे बाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय/लॉन्स, हॉल्सचे मालक यांनी याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशनकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अटीवर सकाळी 07.00 ते रात्री 07.00 वाजता या वेळेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक 20/03/2021 पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळया ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर
कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.

8) लग्न समारंभ व इतर समारंभाचे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन घरच्या घरी शास्त्रोक्त/वेदीक पध्दतीने अथवा नोंदणीकृत विवाह पध्दतीने साजरा करण्यात यावेत.नोंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींनी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

9) सर्व प्रकारचे सामाजिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सव, समारंभ, यात्रा, दिंडया, ऊरुस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील.

10) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 05 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील. सदरची ठिकाणे सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतील शनिवार व रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील.

11)सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.
12) जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टॅक हे राज्यस्तरीय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा /कार्यक्रम बंद राहतील.
13) सर्व प्रकारचे सिनेमागृहे, मनोरंजन पार्क्स, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे पूर्णपणे बंद राहतील.
14) खाद्यगृहे, परमिट रुम/बार फक्त सकाळी 07.00 ते रात्री 09.00 वाजेपावेतो कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरी चे किचन /वितरण कक्ष रात्री 10.00 वाजेपावेतो सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
15) कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील.( तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील.) मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या
मर्यादेतून सूट राहील.
16) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच
कोविड-19 ची लक्षणे दिसून येणा-या संशयित कर्मचा-यांची कोविङ-19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.
17) जळगांव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता, सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे, सर्व व्यक्तींनी चेह-यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे तसेच सॅनिटाईजरचा वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील. सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रिटेलर्स (किरकोळ व्यापारी)यांना प्रवेश असणार नाही. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव व सर्व सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी संबंधित बाजार समितीच्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन कोविड-19 नियमावलीचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी.
18) भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील आणि एका आड एक याप्रमाणे ओटे सुरु राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने घ्यावी.
19) गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल,
20) संपूर्ण जळगांव जिल्हयात दिनांक 16/03/2021 पासून रात्री 10.00 वाजेपासून सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) घोषित करण्यात येत आहे. मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या
कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार ( तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील), बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील.
21) सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 चे मागदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत जनजागृती करावी.
22) तसेच कोविड-19 बाबतीत शासनाचे मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे , हँड सॅनिटायझरचा वापर इ. बंधरकारक राहील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फोजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
सदरचा आदेश हा आज दिनांक 14/03/2021 रोजी मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.