जळगावात खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ नागरिकांचे आंदोलन

0

जळगाव : शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेले असून या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत रामानंद नगर परिसरातील संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर आज दि. २८ मंगळवारी रामानंद नगरचा रस्ता अडवून रस्ता आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना देखील रस्ते दुरुस्तीसाठी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरावे लागले. यावेळी संतप्त नागरिकांनी आमदार सुरेश भोळे व महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली. पाच वर्षात काय केले…, काम जमत नसेल तर राजीनामा द्या.. अशी मागणीही नागरिकांनी यावेळी केली.

शहरातील सर्वच रस्ते हे आज खड्डेमय झालेले असून यामुळे शहरातील सुमारे साडेपाच लाख नागरिकांचे या खराब रस्त्यांनी हाडे खिळखिळे केले आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये आमदार सुरेश भोळे तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात तिव्र असंतोष निर्माण झाला. असून आज तो रामानंद नगरच्या रस्त्यावर पाहण्यास मिळाला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे, भारती राणे यांच्यासह नागरिकांनी रामानंद नगर रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलन आज सकाळी साडेअकरा वाजता केले. रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने आमदार सुरेश भोळे तसेच नगरसेवक कैलास सोनवणे आंदोलनास्थळी येवून नागरिकांची समजूत काढत होते. तसेच सात दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन यावेळी नागरिकांना दिले.

अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीसाठी काव्यरत्नावली ते गिरणाटाकी पर्यंत खोदलेले रस्ता मक्तेदाराने गेल्या वर्षभरापासून व्यवस्थित न बुजविल्यामुळे शहरातील नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणे देखील मुश्‍कील होते. पावसाळा गेला तरी मक्तेदार खोदलेला रस्ता चांगला करत नसून त्याच्यावर आधी कारवाई करा अशा तिव्र शब्दात मागणी आमदार व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली. काव्यरत्नावली चौक ते गिरणाटाकी रस्त्यावर काव्यरत्नावली चौकाच्या काही अंतरावर जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. परंतू तेवढ्याच रस्त्याचे काम केले जात असा प्रश्‍न यावेळी नागरिकांनी आमदार, नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांना उपस्थित केला. बाकीचे लोक माणूस नाही का असा तिव्र शब्दात नागरिकांनी कानउघाडणी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.