जळगावमधून कंकणाकृती सूर्यग्रहण ६६ टक्केच दिसणार

0

जळगाव | खगोलप्रेमींना येत्या २१ जून रोजी वर्षातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी दुर्मीळ कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्याची संधी दुसऱ्यांदा मिळणार आहे. या आधी २६ डिसेंबर २०१९ रोजी ही संधी मिळाली होती. २१ जून रोजी ग्रहणाची सुरुवात सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी मध्य आफ्रिकेतून होईल आणि शेवट सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी फिलिपिन्स येथे होईल. भारतात सूर्यग्रहणाची सुरुवात १० वाजता होईल. पण चंद्राच्या गडद सावलीचा मार्ग उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही शहरांमधून जाणार आहे.

त्यामुळे त्यांना पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे, तर उर्वरित भारत मात्र चंद्राच्या विरळ सावलीत असल्याने हे ग्रहण कमी-अधिक प्रमाणात खंडग्रास स्वरूपातच दिसणार आहे. जळगावमधून हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात म्हणजे ६६ टक्केच दिसणार आहे. ग्रहणाला सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी सुरुवात होईल. ११ वाजून ४९ मिनिटांनी चंद्राने सूर्याला ६६ टक्के झाकलेले असेल. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरुवात होईल आणि दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी ग्रहण संपेल. खंडग्रास सूर्यग्रहणाचा संपूर्ण काळ ३ तास ३१ मिनिटांचा असेल. दरवर्षाप्रमाणे यंदा लॉकडाऊनमुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नसल्याने जळगाव खगोलप्रेमी ग्रुपच्या वतीने या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या अद्भुत सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण गुगल मीटवर करणार आहोत. https://meet.google.com/ttp-rfcb-zee या लिंक वरून जोडले जाऊ शकतात किंवा https://chat.whatsapp.com/BwB53UCktl39 Uzkq8tBSpj या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे जोडले जाऊ शकतात. अधिकाधिक नागरिकांनी या दुर्मीळ खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.