चाळीसगांवचा जवान यश देशमुखला वीरमरण

0

श्रीनगर च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद

चाळीसगाव– जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ नोव्हेंबर रोजी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख (वय – २१) हा जवान शहीद झाला.

श्रीनगरच्या बाहेर असलेल्या परिम्पुराच्या खुशीपुरात दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. सध्या सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चालू वर्षात आतापर्यंत ४ हजार १३७ पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान शहिद झालेला जवान यश देशमुख हा मराठा रेजिमेंट १०१ बटालियनचा जवान असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉइंटवर जवान तैनात केले होते. यश देशमुख आणि उत्तरप्रदेशचा जवान ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. तेथे अचानक तीन दहशतवादी आले आणि त्यांनी अंदाधुंदी गोळीबार करीत यश आणि सोबतच्या जवानाला गंभीर जखमी केले. यात दोघंही जवानांना वीर मरण आले.

तिघ दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानचे तर एक स्थानिक असल्याची माहिती मिळाली आहे. यशच्या वीर मरणाची माहिती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. यश देशमुखचे पार्थिव शनिवारी २८ रोजी जळगाव जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितले.

यश देशमुखच्या पश्चात आई- वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. यशचा भाऊ पंकज देशमुख हा चाळीसगाव शहरातील महाविद्यालयात अभियांत्रिकीचा डिप्लोमा करीत असून आई-वडील शेती करतात, तर यशला दोन बहिणी आहे. मोठी प्रतीक्षा यांचा विवाह झाला असून दुसरी भगिनी अश्विनी देशमुख या शिक्षण घेत आहे. यश यांनी मागच्यावर्षी प्रशिक्षण पूर्ण केले याच वर्षी सैन्य दलात निवड झाली होती. सुमारे चार महिन्यापूर्वीच यश ला नियुक्ती मिळून श्रीनगर येथे त्याला ड्युटी देण्यात आली होती.

यश ला वीरमरण आल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.