घरात घुसून युवकाच्या कुटुंबीयांना मारहाण ; तिघा संशयितांना अटक

0

जळगाव प्रतिनिधी |  एका मुलीवर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन कुसुंबा गावात घरात घुसून युवकाच्या कुटुंबीयांना दगड, स्टम्प, काठ्यांनी मारहाण केली. घराचे दरवाजे, संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी एका अल्पवयीनासह पसार झालेल्या तीन संशयितांना अटक केली. संतोष उर्फ बब्या सुभाष कोळी (वय २२) व दिनेश उर्फ गोलू मधुकर पाटील (वय १९) असे त्या दोघा संशयितांची नावे आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कुसुंबा येथे अमोल सोनवणे या युवकाच्या घरासमोर शुभम कोळी, दीपक कोळी व भूषण कोळी हे युवक आले होते. त्यांनी अमोलला मारहाण केली होती. तसेच सायंकाळी ७.१५ वाजता शुभम कोळी, दीपक कोळी, भूषण सुकदेव ठाकरे, संतोष उर्फ बब्या सुभाष कोळी, अक्षय दीपक जाधव, आकाश कोळी, भिकन कोळी व इतर तीन ते चार जण स्टम्प, दगड, काठ्या हातात घेऊन आले. त्यांच्या भितीने सोनवणे कुटुंबीयांनी दरवाजा लावून घेतला. त्यानंतरही त्यांनी दगडफेक केली. घराचा दरवाजा तोडून अमोल सोनवणे, कुंदा सोनवणे, भास्कर सोनवणे यांना मारहाण केली व संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संतोष व दिनेश हे दाेघे पसार झाले हाेते.

Leave A Reply

Your email address will not be published.