खामगावात कायदा-सुव्यवस्था धोक्यात, जबाबदार कोण

0

खामगाव (प्रतिनिधी)- शहरात भूमाफिया, सरकारव्दारा प्रतिबंधित गुटखा विक्री यासह अवैध धंद्याचे रॅकेट सक्रीय असल्याने  आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच अतिक्रमण, वरली मटका, वेश्या व्यवसाय, अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून तर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. काल झालेल्या खुनाच्या घटनेने ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली असताना कोणत्याही प्रकरणात पत्रकारांनी विचारणा केल्यास पोलिस फक्त तपास चालू आहे, इतकेच सांगतात. परंतु पिडितांना न्याय मिळवुन देण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. कदाचित पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याकारणानेही हे होत असावे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्यास जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केल्या जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कायदा-सुव्यवस्था कोणी धोक्यात आणून ठेवली आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे, तर वाढत्या गुन्हेगारीच्या बाबतीत राजकीय नेत्यांमुळे की पोलिस प्रशासनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. परंतु, तरीदेखील कोणी ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही. काही मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी राजकीय नेते अवैध धंदे व गैरकारभाराला अभय देऊन समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यामुळेच कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. मागील काळात तलाठी राजेश चोपडे भूखंड घोटाळा प्रकरण, कुलस्वामिनी भागीदार फर्म मधील भागीदाराचे घोटाळा प्रकरण, टेंभूर्णा येथील राठी यांचे भूखंड हडप प्रकरण आदी आर्थिक गुन्हेगारीची प्रकरणे घडली असून याबाबत शहर पोस्टेला गुन्हे सुध्दा दाखल आहेत.

सदर प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत तर पोलिसांचा त्यांच्या परीने तपास सुरू आहे. परंतु सामाजिक शांतता ढवळून निघत आहे. मागील सुमारे दीड वर्षापूर्वी अवैध व अतिक्रमणाच्या वादामुळे घाटपुरी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले आहे. आज तेथेच वरलीचे अड्डे जोमात सुरू आहेत. एवढेच नव्हेतर बायपासवर अवैध दारू विक्री, वेश्या व्यवसाय जोमात सुरू आहे. पण रक्षकांनाच हप्ते मिळत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार कोण, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. अलिकडेच होळी सणाच्या पूर्वदिनी आठवडी बाजारात जमावाकडून प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली आहे.

याप्रकरणाची शाई वाळते ना वाळते तोच निर्मल टर्निंग पाईंटवर प्रवासी बसविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ऑटो चालकाने दुसर्‍या ऑटोचालकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना काल 1 एप्रिल रोजी घडली. या सर्व प्रकरणांमुळे शहरातील शांततेचे वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे येथे पोलिस प्रशासन कार्यरत आहे किंवा नाही अशी शंका सर्व सामान्य जनता उपस्थित करीत आहे. एकंदरीत शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे दिसून येत असून पोलिस प्रशासनाने याबाबत खंबीर भूमिका घेणे महत्वाचे आहे, असेही नागरिक बोलत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.