खाजगी डॉक्टरांनी टायफाईड रुग्णांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक

0

 जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील तोंडापुर येथे मृत्यु झालेल्यापैकी 4 व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आल्यामुळे सदर घटनेची दखल तहसीलदार अरुण शेवाळे यांनी घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तोंडापुर गावातील मृत्युचे सर्वेक्षण व ग्रामपंचायतीच्या मदतीने वार्ड निहाय कोरोना चाचणी कॅम्प घेण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार आज गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांनी स्वतः विशेष पथकासह भेट देऊन ग्रामपंचायत तोंडापुर, ग्रामविकास अधिकारी अनंत वंजारी,तलाठी शिवाजी काळे तोंडापुर, पोलीस पाटील जितेंद्र पाटील,माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील,सर्कल तोंडापुर विभाग,अंगणवाडी विभाग, तसेच गावातील स्वयंसेवक यांच्या सहकार्याने आज गावातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. तसेच प्रत्येक खाजगी डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्याबाबत कडक सुचना दिल्या.

तसेच प्रशासनास सहकार्य न करणाऱ्या नागरिकां विरुध्द साथरोग कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील असे गटविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच गावात काही दिवस वार्ड निहाय कोरोना कॅम्प घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मृत्यूचे सर्वेक्षण केले असता असे लक्षात आले की काही नागरिक कोरोना चाचणी करून घेत नाही व याहूनही गंभीर बाब म्हणजे जे खाजगी डॉक्टर आहेत ते कोरोना चाचणी न करता केवळ टायफॉईड चाचणी करतात व रुग्णाला अधिक प्रमाणात सलाईन लावतात याने काही रुग्ण बरे ही होतात परंतु काहींना जीव गमवावा लागत आहे. सदर प्रकार सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात चालू असून तळेगांव, पाळधी, पहुर,बेटावद भागात सर्रास चालु असल्याच्या निनावी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

या अनुषंगाने इनसिडेंट कमांडर तथा तहसीलदार जामनेर यांनी खाजगी डॉक्टरांना व खाजगी लॅब ला आदेशीत केले आहे की ज्या रुग्णांची टायफॉईड ची टेस्ट केली जाईल त्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी अँटीजन व आर टी पी सी आर बंधनकारक करण्यात येत आहे.खाजगी डॉक्टर च्या अधिक सलाईन लावण्यामुळे किंवा चुकीच्या उपचारामुळे मृत्यु झाल्यास सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी प्रशासनातर्फे सांगितले.सर्वेक्षण टीममध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील, डॉ.पल्लवी राऊत,डॉ.योगेश राजपूत, डॉ.कुणाल बावस्कर, डॉ.विवेक जाधव, डॉ.किरण धनगर, तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी, आरोग्य सहाय्यीका सुनंदा सोनवणे, गटप्रवर्तक रेखा तायडे,आरोग्य सेवक के.पी.शहाणे, आरोग्य सेविका उषा सानप यांचा समावेश होता.सर्व आशा स्वयंसेविका, डॉ. अनिल पाटील,डॉ.इलियास शेख,डॉ. व्ही.टी. पाटील, डॉ.दीपक पाटील,डॉ.नंदलाल जाधव, डॉ.प्रदीप पाटील व ग्रामस्थ यांचे शिबिरास अनमोल सहकार्य लाभले. शिबिरात 88 पैकी 32 नागरीक पॉझिटिव्ह आढळून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.