खबरदार ! रेमडेसिवीरसह अन्य औषध वाढीव मूल्यास विकल्यास होणार कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

0

जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीत काही जण रेमडेसिवीरसह अन्य औषधांचा साठा करून वाढीव मूल्यात विकत असल्याचे लक्षात घेऊन असा प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने आज एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून औषधांच्या काळ्याबाजारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असतांना काही होलसेल आणि रिटेल औषध विक्रेते रेमडेसिवीर, टोसीझुनाब आणि इटोलीझुनाब या औषधींचा साठा करून कृत्रीम टंचाई निर्माण करत आहेत. तसेच याची चढ्या दराने विक्री करत असल्याचेही दिसून आले आहे.

या अनुषंगाने, औषधीच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी रेमडेसिवीर, टोसीझुनाब आणि इटोलीझुनाब या औषधांची विक्री ही शासकीय कोविड रूग्णालये, कोविड केअर सेंटर्स आणि जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेल्या रूग्णालयांमधील रूग्णांसह परवानाधारक औषध विक्रेते आणि शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांनाच विकण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा अपवाद वगळता प्रिस्क्रीप्शन शिवाय वा अन्य कुणा खासगी व्यक्तींना रेमडेसिवीर, टोसीझुनाब आणि इटोलीझुनाब या औषधी विकण्याची बंदी घालण्यात आलेली आहे. यासोबत, संबंधीत औषधांची कृत्रीम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी होलसेल व रिटेल औषधी विक्रेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा या निर्देशांमध्ये देण्यात आलेला आहे. तर, यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष ठेवण्याचेही सूचविण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.