कोरोनाच्या काळातही शिक्षण क्षेत्रात आशेचा किरण जपण्यासाठी “मिल के चलो” या संस्थेची धडपड

0

अमळनेर(प्रतिनिधी) : आपण सगळे जाणतो की कोरोनाचा सगळ्यात मोठा परिणाम हा शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. शाळा, महाविद्यालये गेल्या वर्षभरापासून बंदच आहेत. शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाने काही ना काही प्रयत्न चालू आहेत पण ग्रामीण भागात तंत्रज्ञान आणि साधनांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे खुप मोठे नुकसान होतांना दिसते. अशा परिस्थितीतही हार न मानता काही शाळा , सामाजिक संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून झटत आहेत. त्यातलीच एक म्हणजे अमळनेरची ‘ मिल के चलो असोसिएशन ‘ ही सामाजिक संस्था.

या संस्थेने २०१९ पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरु केले आहेत. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या तरीही संस्थेने विद्यार्थ्यांसोबत संपर्क कायम ठेवण्याचा कसोशिने प्रयत्न केला. अमळनेरजवळील शिरसाळे, वावडे, मांडळ आणि धार या गावातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईलच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे केला गेला.

नंतर डिसेंबर २०२० पासून वावडे गावातील श्री प्रकाश कौतिक पाटील यांच्या घरात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी अनौपचारिक शैक्षणिक केंद्र सुरु केले. यात वावडे गावातील ५ वी ते १०वी गटातील ४० मुलं नियमीत अभ्यासासाठी येत होती. त्यांना वेगवेगळ्या अनौपचारिक पद्धतीने शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न संस्थेचे संस्थापक श्री अनिरुद्ध पाटील आणि सौ. कल्याणी पाटील या जोडीने केला. त्यात विज्ञानाचे प्रयोग, पुस्तक वाचन, टाकाऊ पासून टिकाऊ, ओरिगामी, बौद्धीक खेळ ई. माध्यमातून मुलांचा अभ्यास घेण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील मुलांचा शिक्षणाशी संपर्क टिकून राहण्यास नक्कीच मदत होते झाली आहे. आता मुलांसाठी पुस्तकालय सुरु करण्यात येणार असून त्यासाठी १८० पुस्तकं संस्थेला ‘प्रथम’ या संस्थेकडून देणगी स्वरुपात मिळाली आहेत.

या कामात संस्थेचे सहकारी विनायक पाटील आणि दिनेश पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.