कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

0

जळगाव :- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 651 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (7 सप्टेंबर रोजी) 4 हजार 85 संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 284 इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या 9 हजार 398 बाधित रुग्णांपैकी 8 हजार 154 रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये तर जागरुक राहून आपल्या कुटूंबात कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी नागरीकांना केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 1 लाख 49 हजार 284 चाचण्यांपैकी 1 लाख 14 हजार 267 अहवाल निगेटिव्ह तर 33 हजार 618 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण हे 22.51 टक्के इतके आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.43 टक्के इतके वाढले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याबरोबर त्याचे रहिवासी भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून या परिसराचे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत निर्जतुकीकरण करण्यात येते. तसेच या भागातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात 1490, जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात 1053 तर जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 1108 भाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या भागात शासनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन होत आहे किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यात येत असून तेथील ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रीसुत्रीनुसार गृह विलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांशी व नागरीकांशी संवाद साधण्यात येऊन त्यांना शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहनही या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.